दुष्काळाची भीती नको;- शरद पवार

नवी दिल्ली दि.३- मॉन्सून पावसाने देशात सर्वत्र ओढ दिलेली असली तरी त्यामुळे दुष्काळाची भीती बाळगण्याची मुळीच आवश्यकता नाही, मॉन्सून उशीरा येत असला तरी तो नेहमी इतकाच पाऊस देईल, असा विश्वास केन्द्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
२ जुलैपर्यत केवळ ३१ टक्के पाऊस पडल्याची कबुली देऊन ते म्हणाले की, काही राज्यात लवकर पेरण्या होत असतात. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच, उत्तर प्रदेश, बिहारचा काही भागास त्याचा फटका बसला आहे.

यंदा ९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ही नॉर्मल स्थिती म्हणता येईल. मात्र, जर तुम्ही गेल्या वर्षीशी तुलना करणार असाल तर मात्र ते प्रमाण कमी आहे. कर्नाटक, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश,बिहारमध्ये मक्याची कमतरता आहे. तरी एकूण परिस्थिती फार काळजी करण्यासारखी नाही, असेही ते म्हणाले.

पवार म्हणाले की, देशात अन्नधान्याची टंचाई नाही. वेळ पडल्यास त्याचा पुरवठा करण्याची सरकारची तयारी आहे. सरकार खुल्या बाजारपेठेत उतरण्यास तयार आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात आपल्याला ७० टक्के पाऊस मिळेल, त्यामुळे सध्याची तूट भरून काढण्यास भरपूर वाव आहे.

Leave a Comment