नवी दिल्ली २ जुलै-माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांनी २००५ मध्ये राजीनामा लिहून ठेवला होता. परंतु, ’मिसाईल मॅन’ म्हणून ओळख असलेल्या कलाम यांनी राजीनाम्याचे अस्त्र वेळीच म्यान केले. निमित्त होते बिहार विधानसभा भंग करण्याच्या निर्णयाचा. ’टर्निंग पॉइंट’ या नव्या पुस्तकात काही अनुभवांचा उल्लेख कलाम यांनी केला आहे.
राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात आलेल्या प्रत्येक आव्हानाचा आणि त्या आव्हानांना ते कसे सामोरे गेले, याचे वर्णन त्यांनी या पुस्तकात केले आहे.
पुस्तकातील उल्लेखानुसार, कलाम यांनी २३ मे २००५ रोजी राजीनामा लिहीला होता. त्याबद्दल कलाम यांनी लिहीले आहे की, मी त्यावेळी मॉस्को दौर्यावर होतो. पंतप्रधानांनी मला दोन वेळा दुरध्वनी केला होता. बिहारच्या राज्यपालांच्या अहवालाच्या आधारे विधानसभा भंग करण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
एवढी घाई का आहे, असे मी त्यांना विचारले होते. परंतु, सरकारने निर्णय घेतला होता. त्यानंतर मीदेखील विधानसभा भंग करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. माझ्या विशेष आग्रहानंतरही सरकारने राष्ट*पतींच्या निर्णयाची न्यायालयात योग्य प्रकारे पाठराखण केली नाही. त्यामुळे न्यायालयाने विपरित टीप्पणी केली. म्हणून मी राजीनामा लिहीला होता.
परंतु, मनमोहन सिंग यांनी विनंती केल्यानंतर निर्णय बदलला. राजीनामा दिल्यास मोठा गदारोळ होईल आणि सरकार पडू शकते. म्हणून पंतप्रधानांनी विनवणी केली होती, असे कलाम यांनी लिहीले आहे.