राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी नेत्यांची चाचपणी

मुंबई, दि. ३० – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी प्रमुख पदाधिकारी, नेते तसेच कार्यकर्ते यांच्याशी दिवसभर चर्चा केली. इच्छुक उमेदवारांशी ते बोलले. यावेळी बहुसंख्य नेत्यांनी १९९९ च्या काळातील, तळागाळातील कार्यकत्यांची एकजूट करून, पक्ष संघटनेची फेरबांधणी करेल, असा अध्यक्ष असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. ओबीसी, महिला, अल्पसंख्याक, युवती तसेच विद्यार्थी यासर्व घटकांसोबत मुंबईतील महानगरी संस्कृतीशी जुळवून घेणारा हवा असे मत बहुसंख्यांचे पडले.

शरद पवार यांनी शुक्रवारी आ.किरण पावसकर, खा. संजय दिना पाटील, कामगार नेते विजय कांबळे प्रदेश चिटणीस बाप्पा सावंत यांच्याशी चर्चा केली. जयंत पाटील यांच्या रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी शरद पवार यांनी ही चाचपणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी प्रदीर्घ चर्चा केली. मुंबईच्या अध्यक्षपदाकरिता बाप्पा सावंत यांचे नाव आघाडीवर आहे. विजय कांबळे, संजय दिना पाटील आणि किरण पावसकर यांच्या नावाचाही विचार केला जात आहे. मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी पवारांसोबत चर्चा केल्याचे समजते.

शनिवारी सकाळपर्यंत राष्ट्रवादी मुंबई विभागीय अध्यक्षपदाचे नाव पवार जाहीर करण्याची शक्यता आहे, असे प्रवक्ता मदन बाफना यांनी सांगितले. नवे अध्यक्ष २०१४ मध्ये होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांकरीता नेतृत्व सक्षम करणारा असावा अशी अपेक्षा अनेक पदाधिकार्‍यांनी पवार यांच्याकडे व्यक्त केल्या.

विद्यमान अध्यक्ष यांनाच काही काळाकरिता मुदतवाढ देण्याचा पवार यांच्यासमोर असून त्यावरही लवकर निर्णय होईल असे समजते.

       

Leave a Comment