दुसरे लग्न करणार्‍या महिला आमदाराला बेदम मारहाण

करीमगंज-आसाममधील काँग्रेस आमदार रूमी नाथ यांना जमावाने बेदम मारहाण केली आहे. रुमी नाथ यांनी त्यांच्या पहिल्या नवर्‍याला सोडचिट्ठी न देता, आपल्या फेसबुक फ्रेण्डशी दुसरे लग्न केल्याच्या कारणावरून त्यांना मारहाण झाली आहे.

जमावाच्या या हल्ल्यात रुमी नाथ आणि त्यांचा दुसरा नवरा जाकी झाकीर हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

रूमी नाथ आणि जाकी झाकीर हे एका हॉटेलमध्ये थांबले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सुमारे २०० लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे आसाम पोलिसांनी सांगितले.

रुमी नाथ यांचे राकेश सिंह यांच्याशी पहिले लग्न झाले आहे. त्यांना दोन वर्षाची एक मुलगी आहे. मात्र राकेश यांना सोड़चिट्ठी न देता रुमी यांनी दुसरे लग्न केले.

तत्पूर्वी गेल्या महिनाभरापूर्वी रुमी नाथ गायब असल्याची तक्रार राकेश सिंह यांनी दिली होती.

रुमी नाथ या बोरखोला मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. पहिल्यांदा म्हणजे २००६ मध्ये त्या भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि दुसर्‍यांदा निवडून आल्या.