
पुणे, दि.२७ – शहरात आणखी अकरा मार्गांवर शेअर रिक्षा सुरू करण्याचे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मान्य करण्यात आले. रिक्षाचालकांना ओळखपत्र घेणेही बंधनकारक करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

पुणे, दि.२७ – शहरात आणखी अकरा मार्गांवर शेअर रिक्षा सुरू करण्याचे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मान्य करण्यात आले. रिक्षाचालकांना ओळखपत्र घेणेही बंधनकारक करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी अरुण येवला, जिल्हाधिकारी विकास देशमुख, वाहतूक पोलिसांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. शहरात सप्टेंबर २००८ मध्ये सर्वांत प्रथम पाच मार्गांवर शेअर रिक्षा मंजूर झाली होती. शिवाजीनगर ते पुणे स्टेशन, स्वारगेट ते पुणे स्टेशन, स्वारगेट ते शिवाजीनगर, कोथरूड ते डेक्कन, पौड रोड ते डेक्कन या मार्गांचा त्यामध्ये समावेश होता. आणखी अकरा मार्गांवर ही योजना सुरू करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाने मंगळवारी मंजूर केला. तसेच, रेल्वेस्थानक आणि विमानतळ येथे प्रीपेड रिक्षा योजना सुरू केली जाणार आहे. ओळखपत्र अनिवार्य करण्यास रिक्षा संघटनांनी सहमती दर्शविली होती. त्यामुळे रिक्षाचालकांना पन्नास रुपये भरून हे ओळखपत्र घ्यावे लागणार आहे. रिक्षा व्यवसाय करताना, ते गळ्यात घालावे लागेल आणि त्याची एक प्रत प्रवाशाला दिसेल या पद्धतीने लावावी लागणार आहे.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमजीएनएल) होणार्या सीएनजी पुरवठ्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. अनियमित पुरवठ्यामुळे वाहनचालक, व्यावसायिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार केली जात होती. हा पुरवठा नियमित करण्यासंदर्भात एमजीएनएलला सूचना देण्यात आल्या आहेत. पीएमपीविषयी अनेक तक्रारी आल्या असून, त्या दूर करण्यात याव्यात, असे पीएमपी प्रशासनाला सांगण्यात आले.