अखिल मंडई मंडळ – शारदा गणेश मंदिर

पुणे दि.२८- सार्वजनिक गणेशोत्सवात ११८ वर्षे पूर्ण केलेले पुण्याचे अखिल मंडई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या लोकप्रिय आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शारदा गणेश यांच्यासाठी कायमस्वरूपी मंदिर उभारणी करत असून यासाठी दीड कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. सुमारे ३ हजार स्क्वेअर फूट जागेत हे मंदिर मंडईतच उभारले जात आहे.

या मंडळाकडे झोपाळ्यावर विराजमान झालेल्या शारदा व गणेशाच्या मूर्तींचे दोन सेट आहेत. या दोन्ही मूर्ती मंदिरात बसविल्या जाणार असून सार्वजनिक गणपतीसाठी कायमस्वरूपी मंदिर बांधण्याचा हा पुण्यातील दुसरा प्रकल्प आहे. सुमारे नऊ वर्षांपूर्वी म्हणजे २००३ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाने सात कोटी रूपये खर्चून मंदिराची उभारणी केली होती. मंडई मंडळाच्या या मंदिराचा उद्घाटन सोहळा जानेवारी २०१३ मध्ये गणेश जयंतीच्या दिवशी करण्याचा मंडळाचा मानस आहे. दोन मूर्ती एकाच मंदिरात हे याचे वैशिष्ट्य. दोन पैकी एक मूर्ती मुख्य गाभार्‍यात तर दुसरा सेट ध्यानमंदिरात बसविला जाणार आहे.

मंडळाचे खजिनदार संजय माटे यांनी दिलेल्या माहितीनुसार समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनी हे बांधकाम करत असून त्याची आतील सजावट अभिजित पवार यांचेकडे सोपविण्यात आली आहे. भाविकांकडून या बांधकामासाठी देणग्या दिल्या जात आहेतच पण एका मोठ्या उद्योग समूहानेही त्यासाठी मोठी देणगी दिली आहे. मंदिरात १२ सीसीटिव्ही सुरक्षेसाठी बसविले जाणार आहेत.

तुळशीबागेतील बाबू गेनू मंडळानेही त्यांच्या गणेशासाठी तुळशीबागेतच असेच कायमस्वरूपी मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. बाबू गेनू मंडळाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत.

Leave a Comment