काँग्रेसचे अरविंद नेताम यांचा संगमांना पाठिंबा

नवी दिल्ली दि. २८ – छत्तीसगडचे आदिवासी नेता आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांनी गुरूवारी बंडखोरी करीत पी.ए संगमा यांची साथ दिली आहे. संगमा अर्ज दाखल करताना ते त्यांच्याबरोबर होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसकडून नेताम यांच्याविरूद्ध पक्षविरोधी कारवाई होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपती पदाचे संपुआचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना टक्कर देण्यासाठी मैदानात उतरलेले पी ए संगमा यांनी गुरूवारी दुपारी २.३१ वाजता राज्यसभा सचिवालयात अर्ज दाखल केला.

संगमा अर्ज दाखल करताना त्यांच्याबरोबर भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभा विरोधी पक्षनेते सुषमा स्वराज, राज्यसभा विरोधी पक्षनेते अरूण जेटली, भाजप अध्यक्ष नितीन गडकरी उपस्थित होते. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादलही संगमासोबत होते. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकली.

तत्पूर्वी, संयुक्त पुरोगामी आघाडीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्याबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित होते.

मुखर्जी यांनी अर्जाच्या चार प्रती दाखल केल्या. त्यातील एकावर संयुक्त जनता दलाचे शरद यादव यांनी प्रस्तावकाची स्वाक्षरी केली आहे. प्रणव मुखर्जीना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी संपुआ प्रयत्न करीत आहे.

Leave a Comment