नंबर दोनसाठी स्पर्धा

अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा उत्तराधिकारी अजून नक्की  झालेला नाही. डॉ. मनमोहनसिंग यांचा कोणताही निर्णय घेण्याचा वेग विचारात घेतला तर ते या जागी लवकर नवा मंत्री नेमतील असे काही दिसत नाही. पण प्रणव मुखर्जी यांच्या लोकसभेतून जाण्याने केंद्राच्या पातळीवर काही प्रश्‍न निर्माण होणार आहेत.

सगळ्यात मोठा प्रश्‍न म्हणजे प्रणव मुखर्जी यांची संसदेतली जागा कोण घेणार? ही जागा सोपी नव्हती.  सोपी नव्हती म्हणजे प्रणव मुखर्जी यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि शिष्टाई करण्याच्या क्षमतेने तिला अनेक आयाम दिले होते. ते अर्थमंत्री होते आणि लोकसभेतले कॉंग्रेसचे नेते सुद्धा होते. या पदावर सोनिया गांधी याच काम करतील असे दिसत आहे. पण तेवढ्याने काम भागणार नाही.

प्रणव मुखर्जी कॉंग्रेस पक्षाचे जुने-जाणते, अनुभवी नेते सुद्धा होते. इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळापासून ते केंद्रात कार्यरत होते. म्हणून त्यांच्यावर आपोआपच अनेक जबाबदार्‍या येऊन पडत असत. सोनिया गांधी या कॉंग्रेसच्या अध्यक्षा आहेत, पण त्या तशा नामधारी अध्यक्षा आहेत. पक्षातल्या घडामोडींवर त्यांचे म्हणावे तसे नियंत्रण नाही.

अशा प्रसंगी या घडामोडी पंतप्रधान हाताळत असतात. मात्र आपले पंतप्रधान सुद्धा नामधारीच आहेत. अशा अवस्थेत प्रणव मुखर्जी हे पक्षातल्या अनेक घडामोडींमध्ये लक्ष घालत असत आणि पंतप्रधानांनी करावयाची अनेक कामे सुद्धा ते करत असत. पी.चिदंबरम यांनी तेलंगण निर्मितीचा मुहूर्त जाहीर करून जो राडा केला होता. तो शेवटी निस्तरण्यासाठी प्रणवदांनाच गळ घालण्यात आली होती. त्याशिवाय मंत्रिमंडळाच्या दोन तीन समित्यांचे तरी ते अध्यक्ष असत.

एकंदरीत प्रणव मुखर्जी पक्षाचे अध्यक्ष किंवा पंतप्रधान यापैकी काहीही नसून सुद्धा सारी कामे पहात होते. त्यामुळे ते पक्षात क्रमांक दोनचे नेते होते आणि मंत्रिमंडळात सुद्धा क्रमांक दोनचे मंत्री होते. असे हे प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होणार असल्यामुळे मंत्रिमंडळातूनही बाहेर पडले आहेत आणि त्यांनी कॉंग्रेसच्याही सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांच्या या दोन्ही जागा कोण भरून काढेल, असा प्रश्‍न आता दिल्लीत उपस्थित होत आहे. त्यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागेवर नवे अर्थमंत्री नेमले जातील. एक अर्थमंत्री जाऊन दुसरे अर्थमंत्री येतील. परंतु प्रणव मुखर्जी यांची कामगिरी काही वेगळी होती.

नगाला नग दिला म्हणून त्यांची जागा भरून निघणार नाही. त्यांच्याएवढ्या कर्तबगारीचा नेताच तिथे हवा आहे. पक्षाच्या विविध गटांमध्ये आणि विविध प्रकारच्या घटकांमध्ये समन्वय साधण्याच्या बाबतीत प्रणव मुखर्जी यांच्या पाठोपाठ ए.के. अँटनी यांचे नाव घेतले जाते. त्यामुळे विरोधकांशी संपर्क साधणे, सुसंवाद निर्माण करणे, सरकारच्या मित्रपक्षांशी संपर्क ठेवणे ही कामे ए.के. अँटनी चांगली करू शकतील असा विश्‍वास वाटत आहे. यापूर्वी अँटनी यांनी ही कामे केलेली सुद्धा आहेत.

मावळते सरसेनापती व्ही.के. सिंग यांनी निवृत्त होताना बरेच राडे केले होते. मात्र त्यामुळे पेचप्रसंगाची स्थिती निर्माण झाली. ए.के. अँटनी यांनी संरक्षणमंत्री या नात्याने ही स्थिती चांगली हाताळली होती. म्हणून त्यांच्याविषयी एक विश्‍वास व्यक्त केला जात आहे. शिष्टाई करणारा नेता म्हणून प्रणव मुखर्जी यांनी जे स्थान मिळवले होते ते ए.के. अँटनी भरून काढतील, अशी खात्री दिली जात आहे. प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपती होण्याने एक पोकळी निर्माण झालेली आहे ही गोष्ट खरी. परंतु कोणतीही पोकळी ही कायम रहात नसते. ती कोणी ना कोणी तरी भरून काढत असते. तशी ती भरून निघणार आहे. पण ती कोण भरून काढणार या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रणव मुखर्जी यांचे दुसरे पद म्हणजे अर्थमंत्रीपद. या पदावरून मुखर्जी यांनी फार चांगले काम केलेले आहे असे काही म्हणता येत नाही. ते फार समर्थ अर्थमंत्री नाहीतच. मनमोहनसिंग आणि पी. चिदंबरम् यांनी अर्थमंत्रीपदावरून ज्या पद्धतीने काम केले आहे त्या पद्धतीचे काम मुखर्जी यांना करता आलेले नाही. किंबहुना त्यांच्या बाबतीत तसे वाटतच होते. म्हणून मनमोहनसिंग प्रणवदांना अर्थमंत्री करण्यास फारसे उत्सुकही नव्हते. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळातले ते वरिष्ठ स्थान मानले जाते. तसे तर गृहमंत्रीपद सुद्धा मानाचेच असते. मात्र प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री म्हणून, लोकसभेतले कॉंग्रेसचे नेते म्हणून आणि ज्येष्ठ मंत्री म्हणून आपले स्थान क्रमांक दोनचे आहे हे ठसवून दिले होते.

आता मंत्रिमंडळातला नंबर दोनचा मंत्री कोण? हा वाद हळू हळू गरम व्हायला लागला आहे. पी. चिदंबरम्, सुशीलकुमार शिंदे, अँटनी, कमलनाथ, एस.एम. कृष्णा, गुलाम नबी आझाद अशी अनेक नावे घेतली जात आहेत. पण हे क्रमांक दोनचे स्थान कोणीही आपल्या कर्तबगारीवरच सिद्ध करू शकणार आहे. तशी व्यक्ती कोण आहे, याचा शोध घ्यावा लागणार आहे. कॉंग्रेस पक्ष आणि सरकारला सध्या निर्णय लकवा झाला आहे. तो प्रवदांच्या राष्ट्रपती होण्याने अधिक तीव्र झाला आहे एवढे मात्र खरे.

Leave a Comment