चमत्कार घडेल आणि मी निवडून येईन- संगमा

नवी दिल्ली दि.२५- राष्ट्रपतीपदी निवडून येण्यासाठी माझ्याकडे  पुरेशी मते नाहीत असे तुम्हाला वाटत असले तरी चमत्कार घडेल आणि मी निवडून येईन असा विश्वास राष्ट्रवादीचे माजी नेते पी.ए.संगमा यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देवच त्यांचा पाठिराखा आहे. आणि चमत्कार घडतात यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. भारताचा नागरीक आणि आदिवासी जमातीचा म्हणून मला जे हक्क प्राप्त झाले आहेत, त्यानुसार राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्याची माझी इच्छा असणे यात कांही गैर नाही असे सांगतानाच ते म्हणाले की निवडणूक हा विषयच वेगळा आहे. मी आत्तापर्यंत ९ वेळा खासदार आणि दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविली आहे आणि एकदाही पराभव पत्करलेला नाही.

आज जनसामन्यांनात माझी निवडणूक जिंकण्याची शक्यता कमी असल्याची भावना आहे. पण मी येथे सांगू इच्छीतो की, कांही दिवसांपूर्वी मला सहा टक्केच मते मिळतील असे सांगितले जात होते.त्यानंतर भाजपने पाठिंबा दिला आणि त्यांचे सहयोगी पक्षही तसा विचार करत आहेत तर माझी मतांची टक्केवारी ३० ते ३५ टक्कयांवर गेली आहे. अन्य पक्षाची मतेही मला मिळू शकतात कारण ही निवडणूकच वेगळी आहे. येथे लोकसभेच्या फ्लोअरवर मतदान होत नाही. लोकसभेत पक्ष व्हीप जारी करू शकतात, तेथे ५६ कलम लागू असते तर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ५५ कलम लागू आहे आणि हे मतदान गुप्त असते मग तुम्ही आत्ताच मतांचे अंदाज कसे देऊ शकता असा सवालही संगमा यांनी यावेळी केला. पक्षाचा आदेश मानला जातोच असे नाही असे सांगून ते म्हणाले की १९६९ साली असे घडले होते मग आत्ता का घडणार नाही?

ममतांच्या पाठींब्याची वाट पाहतो आहे असे संगमा यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच राजकारणात कांहीही घडू शकते असे सांगून ते म्हणाले की आपल्या शेजारी पाकिस्तानातच बघा. तेथे जुने पंतप्रधान गेले व फारशा प्रसिद्ध नसलेल्या नेत्याच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माला पडली. जगात आश्चर्ये घडतात आणि माझा चमत्कारांवर विश्वास आहे त्यामुळे राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकणार असल्याची खात्रीही संगमा यांनी यावेळी दिली.