रूपयाच्या अवमुल्यनामुळे वैद्यकीय उपकरणे महागणार

मुंबई, दि. २२ – गेल्या काही महिन्यांपासून डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण सुरू असल्यामुळे कच्च्या खनिज तेलापासून अन्नधान्यापर्यंत सर्व वस्तूंची आयात महागली आहे. वैद्यकीय क्षेत्रात वापरली जाणारी अत्याधुनिक उपकरणेही प्रामुख्याने परदेशांतून भारतात आयात केली जातात. रूपयाची घसरण अशीच सुरूच राहिली, तर या उपकरणांच्या आयातीसाठी देखील जास्त पैसे मोजण्यावाचून गत्यंतर उरणार नाही. परिणामी वैद्यकीय सेवा महागून त्याची झळ सर्वसामान्य रूग्णांना बसू शकते.

रूपयाच्या घसरणीने उपकरणांची आयात महागली आहे. यामुळे कंपन्या या उपकरणांची आयात पुढे ढकलत असून, वेट ऍण्ड वॉच धोरण अंमलात आणत आहेत. देशामध्ये जवळपास ७० टक्के वैद्यकीय उपकरणे परदेशातून आयात केली जातात. यात कॅथेटर्स, पेसमेकर्स, ऑर्थोपेडीक व प्रोस्थेटिक अपरायन्सेस, ब्रिदिंग ऍण्ड रेस्पायरेशन ऑपरेटर्स व डेंटल उपकरणांचा समावेश आहे. या उपकरणांची रूपयाच्या अवमुल्यनामुळे आयात महागली असून, वैद्यकीय उपकरणांच्या किंमतीमध्ये आणखी वाढणार आहेत. सद्यस्थितीत कंपन्यांनी या उपकरणांच्या किंमती कशाबशा रोखून धरल्या आहेत. देशातील वैद्यकीय उपकरणांचा सध्याचा व्यवसाय ३.५ अब्ज डॉलर्सचा घरात आहे. गेल्या काही वर्षांपासून देशातील वैद्यकीय क्षेत्राचा झपाटयाने विकास होत असल्यामुळे, २०१५ पर्यंत हा व्यवसाय दुपटीने वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.