मंत्रालयात आगीचे तांडव, दोघांचा मृत्यू

मंत्रालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीला गुरुवारी दुपारी लागलेल्या आगीत चार मजले जळून खाक झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनाजवळ दोन मृतदेह सापडले आहेत. हे मंत्रालयात कामा निमित्त आलेले नागरिक असल्याचे सांगण्यात येते आहे. आम्हाला काहीही करा आणि वाचवा, धुराचे लोळ पसरलेले आहेत, असे संदेश या लोकांकडून पाठवण्यात येत होते, पण आग वाढल्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला होता. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सहाव्या माळ्यावर अग्निशमन दलाला संध्याकाळी सातवाजेपर्यंत पोहचणं अशक्य होते. अग्निशमन दलाने हे दोन मृतदेह शोधून काढले आहेत.

चौथ्या मजल्यावर लागलेली आग अल्पावधीतच सातव्या मजल्यापर्यंत पोहोचली. या ठिकाणी मंत्री आणि त्यांच्या सचिवांची कार्यालये आहेत. त्यात नगरविकास खाते, पाटबंधारे, ऊर्जा तसेच  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय आहे. या आगीत या कार्यालयांतील महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.आग लागल्याचे समजताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुखरूप बाहेर  आले.

दरम्यान, या आगीमध्ये बारा जण जखमी झाले असून त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीची भीषणता पाहता जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

चौथ्या मजल्यावर गुरुवारी दुपारी पावणे तीनच्या  सुमारास भीषण आग लागली.आग लागली त्यावेळी या इमारतीमध्ये सुमारे  पाच हजार कर्मचारी होते. आग इतकी भीषण आहे की आझाद मैदान परिसरातूनही दिसत आहे. आगीच्या धुरामुळे हा परिसर संपूर्ण व्यापून गेला आहे. ही आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या पथकासोबत नौदलाच्या अग्नीशमन दलाचे पथकही शर्थीचे प्रयत्न करत होते.

मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या नगर  विकास खात्याच्या दालनात दुपारी तीन सव्वातीनच्या सुमारास आग लागली. अल्पावधीत ही आग मुख्यमंत्र्यांचे कार्यालयापर्यंत पोहोचली आहे.

आग लागल्याचे सूचित होताच कर्मचा-यांनी तत्काळ खाली धाव घेतली. आगीची बातमी कळताच  तातडीने मुंबई अग्नीशमन दलाचे पथक आणि २८ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत नौदलाचे अग्निशमन पथकही आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते.ज्या मजल्यावर आग लागली होती त्या ठिकाणी असलेल्या कर्मचा-यांना खाली आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.अग्नीशामकदलाच्या मोठ्या रेस्क्यू गाड्या आल्या होत्या. आग विझवण्यासाठी नौदलाचे हेलिकॉप्टर पाण्याचा मारा करत होते. मात्र धुराचे प्रचंड उठणा-या लोटांमुळे आग विझवण्याच्या कामात प्रचंड अडथळे येत होते.

दरम्यान,मंत्रालयात लागलेल्या आगीचे वृत्त कळताच बघ्यांची आरसा गेट येथे एकच गर्दी जमली. त्यांना हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला होता. बघ्यांची गर्दी आणि बाहेर पडणा-यांची घाई यामुळे या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.

बघ्यांची प्रचंड गर्दी

मंत्रालय परिसरात असलेली कार्यालये सुटत असल्यामुळे तिथून निघालेले लोक आग पाहण्यासाठी या ठिकाणी येत असल्यामुळे या परिसरात बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यांना हटवण्याचे मोठे काम पोलिसांना करावे लागत होती. आग बघायला आलेल्या बघ्यांमुळे दक्षिण मुंबईतील वाहतुकीची संपूर्ण बोजवारा उडाला होता.

Leave a Comment