पुणे, दि. २२ – माजी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेते फिदा हुसेन कुरेशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व दोन भाऊ असा परिवार आहे.
माजी कबड्डीपटू फिदा हुसेन कुरेशी यांचे निधन
म्हाळुंगे-बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्य बड्डी असोसिएशनच्या वतीने किशोर व किशोर गटातील मुले-मुलींचे प्रशिक्षण शिबीर सुरु आहे. या शिबीरामध्ये कुरेशी प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम पाहत होते. पिंपरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर शनिवार दि. २३ जून रोजी घोरपडी पेठेतील मोमीन पुरा कबरस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
फिदा कुरेशी यांनी पुण्याच्या राणाप्रताप संघाकडून खेळण्यास सुरुवात केली होती. ते उत्कृष्ट मध्यरक्षक होते. पुण्याच्या बँक ऑफ महाराष्ट्राकडून खेळत होते. तेथूनच ते निवृत्त झाले. निवृत्ती घेतल्यानंतर कुरेशी यांनी पुर्ण वेळ कबड्डी खेळाच्या विकासासाठी दिला. ते बुवा साळवी यांच्या तालमीत तयार झाले होते. आपल्या खेळात नवनवीन तंत्रज्ञान यावे अशी त्यांची नेहमीच इच्छा असे. त्यासाठी ते सर्वच खेळातील तंज्ञांशी सल्लामसलत करीत असे. सध्या ते राज्य संघटनेच्या तंत्रज्ञान समितीचे प्रमुख होते. महाराष्ट्र सरकारनेही त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिवछत्रपती पुरस्कारानेही सन्मानित केले.
राज्यात कबड्डी दिन सुरु करण्याल कुरेशी यांचा मोलाचा वाटा होता. पुढील महिन्यात दि. १५ जुलै रोजी होणार्या कबड्डी दिनाच्या निमित्ताने नवीन प्रयोग करण्याचा त्यांचा मानस होता.
