अखेर संगमाच…

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे गणित ठरलेले आहे. संपुआघाडीकडे ५० टक्के मते नाहीत त्यामुळे त्यांना  म्हणाव्या तेवढ्या सहजतेने विजय मिळणार नाही. सरळ लढत झाली तर काही गडबड होऊ शकते. पण लढत सरळ होणार नाही. डावी आघाडी आपला उमेदवार मैदानात उतरवेल. तसे झाल्यास मात्र संपुआघाडीचा विजय नक्की आहे आणि भाजपा प्रणित रालोआघाडीच्या उमेदवाराचा पराभव तेवढाच नक्की आहे. भाजपाला हरणारी लढाई लढायची आहे पण ती लढवतानाही भाजपा प्रणित आघाडीत एकवाक्यता होत नाही.

प्रत्येक घटक पक्षाचे तोंड वेगळ्या दिशेला आहे. शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठींबा न देता कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची आपली परंपरा आताही कायम ठेवली आहे. २००७ साली शिवसेनेने प्रतिभा ताई पाटील यांचे समर्थन केले होते. ते करताना त्या मराठी असल्याचे कारण सांगितले होते.

आता त्यांनी एनडीएचे उमेदवार संगमा असतानाही प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. जनता दल (यू) हाही एनडीएचा घटक आहे. या पक्षानेही संगमा यांना पाठिंबा न देता प्रणवदानांच आपले समर्थन जाहीर केले आहे. एनडीए आघाडीतले हे दोन पक्ष सोडले तर बाकी पक्षांनी संगमा यांना पाठिंबा दिला आहे. संगमा यांच्या विजयाची अजिबात शक्यता नाही पण तरीही त्यांना आदिवासी मते मिळून  विजयी होण्याची आशा आहे. अर्थात अशा फाटाफुटीवर संगमा यांच्याशिवाय या जगात कोणाचाही विश्‍वास नाही. संगमा यांची लढाई ही हरणारी लढाई आहे. हरणारी लढाई लढतानाही एनडीए मध्ये उमेदवाराबाबत एकमत होत नाही ही मोठीच खेदाची बाब आहे.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारी वरून आघाडीत मतभेद असले म्हणून काही आघाडी फुटत नाही हे खरे पण आघाडीतले पक्ष कोणत्याही गोष्टीवर एका तोंडाने बोलू शकत नाहीत ही वस्तुस्थिती काही लपून रहात नाही. २०१४ साली सत्तेवर येऊन देशाचा कारभार पाहण्याची स्वप्ने हे नेते पहात आहेत (आणि पंतप्रधान कोण असावा यावर आतापासूनच भांडत आहेत) पण त्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकमताने उमेदवारही  निवडता येत नाही.

अर्थात प्रणव मुखर्जी यांची निवड होताना संपुआघाडी सरकारमध्येही असेच मतभेद उफाळून आले होते. या आघाडीत दोन गोष्टी घडल्या. पहिली  म्हणजे आघाडीचा घटक पक्ष असलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी वेगळा सूर लावला. संगमा हे एनडीएचे उमेदवार आहेत पण ते काही या आघाडीतल्या कोणत्या घटक पक्षाचे नेते नाहीत. ते तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  संस्थापक आहेत. त्यांनी पक्षात बंडखोरी करून एनडीएचा उमेदवार होणे पसंत केले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांना पक्षातून काढून टाकले आहे.

एकंदरीत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएत जसे सारे काही आलबेल नाही तसेच संपुआघाडीतही सारे काही सुरळीत नाही. एनडीएला या निमित्ताने थोडा लाभ झाला आहे. मुळात संगमा यांची उमेदवारी जयललिता आणि नवीन पटनायक यांनी पुरस्कारलेली होती. सुरूवातीला या दोघांनीच संगमा यांचे नाव सुचविले आणि त्यांनीच त्यांची पाठराखण केली. त्या वेळी संगमा यांना कोणीही मोठ्या गांभिर्याने घेतले नव्हते. प्रणवदा हे कॉंग्रेसचे उमेदवार होते. भाजपावाले डॉ. कलाम यांच्यावर नजर लावून बसले होते. म्हणून संगमा  हे जयललिता आणि पटनायक या दोघांचेच उमेदवार ठरले होते. पण कलाम यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आणि संगमा यांचे महत्त्व वाढले.

भाजपाला उमेदवार नव्हता  म्हणून त्यांनी या दोन मुख्यमंत्र्यांचा उमेदवार हाच आपला उमेदवार म्हणून जाहीर केला. अशा रितीने संगमा यांनाही थोडा व्यापक पाठींबा मिळाला आणि भाजपाला बरा उमेदवार मिळाला. या घडामोडीत भाजपाच्या शिवसेना आणि जदयू या दोन घटक पक्षांनी फटकून राहण्याची भूमिका घेतल्याने एनडीएला धक्का बसला पण या दोघांमुळे झालेली   वजाबाकी जयललिता आणि नवीन पटनायक यांच्या जवळ येण्याने भरून निघाली. भाजपाचा अगदीच काही तोटा झाला नाही.

डॉ. कलाम यांनी माघार घेतल्याने ममता बॅनर्जी याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे कारण त्यांनी डॉ.  कलाम हेच आपले उमेदवार असल्याचे ठामपणे जाहीर केले होते. आता त्यांना संगमा यांना पाठींबा देण्यावाचून काही पर्याय नाही. तसे झाल्यास भाजपाच्या बाजूने संपुआघाडीचा अजून एक घटक पक्ष आलेला असेल. डॉ. कलाम यांच्या नकाराने तशी मुलायमसिंग यादव यांचीही पंचाईत झाली  पण त्यांनी संपुआघाडीशी जमवून घेतले. कॉंग्रेसमध्ये कशा अविचारी नेत्यांचा जमाव जमला आहे याचेही दर्शन काही वेळा घडते. मुलायमसिंग यादव यांनी डॉ. कलाम यांचा आग्रह सोडून देऊन हळुहळू संपुआघाडीच्या लाईनवर यायला सुरूवात केली होती. पण याच काळात कॉंग्रेसचे प्रवक्ते राशीद अल्वी यांनी उत्तर प्रदेशातल्या एका जाहीर सभेत बोलताना मुलायमसिंग हे भाजपाचे एजंट आहेत असा आरोप केला. राष्ट्रपतीपदाची निवडणूक रोज एका प्रकाराने फिरत आहे असे दिसत असताना आपण मुलायमसिंग यांच्या  बद्दल असे बोलायला नको एवढेही तारतम्य या माणसाला नसावे याचे आश्‍चर्य वाटते.

Leave a Comment