.. तर पुन्हा कलामच राष्ट्रपती झाले असते – अण्णा हजारे

पुणे, दि. २० – राष्ट्रपतीपदाची निवडणूक जर जनतेतून झाली असती, तर डॉ. अब्दुल कलाम हेच पुन्हा राष्ट्रपती  झाले असते, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  यांनी मंगळवारी राळेगणसिद्धी येथे व्यक्त केले. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी हे केंद्रीय मंत्रीमंडळातील सर्वात सक्षम मंत्री असले, तरी आमच्या टीमने त्यांच्याविरुद्ध केलेल्या सर्व आरोपांचे पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा हजारे यांनी यावेळी केला.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अण्णांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्यावर अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांचे समर्थन करताना अण्णांनी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या उमेदवारीचे जोरदार समर्थन केले.

गंगा नदीच्या बचावासाठी साधूंनी केलेल्या आंदोलनाविषयी बोलताना अण्णा म्हणाले की, गंगेसारख्या पवित्र नदीमध्ये सांडपाणी, वेगवेगळया कंपन्यांची रसायने सोडणे दुर्दैवी आहे. साधुंच्या मागणीकडे सरकारने लक्ष न दिल्यास, आम्हालाही या आंदोलनात उतरावे लागेल, असा इशाराही  अण्णांनी यावेळी दिला.

सत्ताधार्‍यांमध्ये या पदांवरून मतभेद निर्माण झालेले असतानाच, विरोधकांचे महाराष्टाच्या मित्रपक्ष शिवसेनेने मात्र अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या उमेदवारीस जाहीर पाठिंबा केल्याच्या पार्श्‍वभूमीवर अण्णांची प्रतिक्रिया महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

दरम्यान, सशक्त लोकपालाच्या मागणीसाठी तब्बल महिन्याभरापेक्षाही जास्त दिवसांचा राज्यव्यापी दौरा केल्यानंतर अण्णा सध्या राळेगणमध्ये विश्रांती घेत आहेत. जनलोकपाल विधेयक, परदेशातील काळा पैसा या प्रमुख मागण्यांसंदर्भात अण्णा सध्या राष्ट्रपती तसेच पंतप्रधानांना पत्र लिहिण्यासंदर्भात आपल्या सहकार्‍यांशी चर्चा करीत असल्याची माहितीही राळेगणमधील सूत्रांकडून मिळाली.

Leave a Comment