कमलचा `विश्‍वरूप’ ऑगस्टमध्ये

दक्षिण भारतीय सुपर स्टार कमल हसन बर्‍याच वर्षांनंतर हिंदी चित्रपटात झळकणार आहे. त्याचे हे पुनरागमन धमाकेदार असणार आहे. `विश्‍वरूप’ हा त्याचा आगामी चित्रपट येत्या ऑगस्टमध्ये प्रदर्शित होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. `विश्‍वरूप’ हा चित्रपट तामिळ, तेलुगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये रिलीज होत आहे. चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक, सहनिर्माता आणि मुख्य अभिनेता अशा वेगवेगळ्या भूमिका कमल यांनी साकारल्या आहेत. अँक्शन थ्रिलर असलेल्या या चित्रपटात कमल हसनसोबत तामिळ अभिनेत्री-गायिका अँड्रा जेरेमी, पूजा कुमार, जयदीप अहलावत, राहुल बोस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे राहुलने या चित्रपटात नकारार्थी भूमिका साकारली आहे. चित्रपटाची गीते जावेद अख्तर यांनी लिहिली असून, शंकर अहसान लॉय यांचे संगीत आहे.