राष्ट्रवादीचा आगामी विधानसभा स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय?

मुंबई दि.१८- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याचा विकास गतीने होण्यासाठी एकहाती निर्णय घेतले जातील असे जाहीर करतानाच आगामी विधानसभात राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूका लढवू शकते असेही सूचित केले आहे.एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पवार यांनी हे सूचित केले आहे. विशेष म्हणजे कृषीमंत्री शरद पवार यांनी कालच आगामी विधानसभा काँग्रेसबरोबर लढू असे विधान करून चोवीस तासही उलटले नाहीत तोच अजितदादांनी हे विधान केले आहे.

 मनसेची वाढ ही केवळ शिवसेनेच्याच मुळावर आलेली नाही तर त्याचा फटका राष्ट्रवादीलाही बसला आहे असे सांगून अजित पवार म्हणाले की सध्या राष्ट्रवादी काँग्रेस हाच महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र आपण कोणत्याच राजकीय पक्षाला कमी लेखत नाही. ग्रामीण तसेच नागरी भागाचा विकास करताना त्यासाठी आखल्या जाणार्‍या धोरणांत लोकांचा सहभाग वाढायला हवा असे आमचे मत आहे. पंचायत राजच्या माध्यमातून राष्ट्रवादीने या भागात अनेक सामाजिक तसेच आर्थिक कार्यक्रम हाती घेतले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात आमचे आणि काँग्रेसचे वर्चस्व आहे पण आम्ही मुंबई, कोकण, विदर्भात कमजोर पडतो आहोत.तेथे मजबूत होण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आगामी विधानसभात निवडणूकीत काँग्रेसबरोबर जायचे की नाही याचा निर्णय निवडणूका जाहीर झाल्यावर घेतला जाईल असे सांगून ते म्हणाले की एकत्र आलो तरी २००९च्या प्रमाणे जागावाटप आम्हाला मान्य नाही. स्थानिक स्वराज संस्था निवडणूकांत आम्ही मोठा पक्ष ठरलो आहोत. एकटे लढायचीही आमची तयारी आहे. राज्यात सुधारणा आणि विकासाला चालना मिळायला हवी तर त्यासाठीचे निर्णय कठोर असले तरी त्वरीत घेतले जायला हवेत. आघाडी सरकारांत ते शक्य होत नाही. पाटबंधारे श्वेतपत्रिकेला आपण कधीच नाही म्हटलेले नाही असाही खुलासा त्यांनी केला. तसेच ज्यांनी विजबिले भरलेली नाहीत त्या गावांना वीज नाही हा निर्णय कठोर असला तरी आर्थिक शिस्त लागण्यासाठी तो आवश्यक होता. या निर्णयाचा परिणाम तत्काळ दिसून आला असून गेल्या दोन महिन्यांत वीज मंडळाने ४०० कोटींचा महसूल विजबिल रिकव्हरीतून गोळा केल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment