जम्मू-काश्मिरात २०१५ मध्ये जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल

‘रियास(जम्मू-काश्मीर) – जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधण्याचे काम सध्या जम्मू-काश्मिरातील चिनाब नदीवर  रियासी जिल्ह्यात वेगाने सुरू असून हा पूल २०१५ मध्ये तयार होईल.

 कौरी येथे हा पूल नदी पात्रावर ३५९ मीटर उंचीचा असेल. ही पुलाची उंची कुतुब मिनारपेक्षा पाचपटीने जास्त आणि आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच असेल. आत्ता सुरू झालेले पुलाचे बांधकाम ४२ महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे संचालक राजेश तिवारी यांनी दिली. या प्रकल्पाचे काम कोकण रेल्वेने हाती घेतले आहे.

२००४ मध्ये या पुलाचा अंदाजे खर्च रु.५१२.७४ कोटी काढण्यात आला होता. आता त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. उधमपूर-श्रीनगर-बारमुल्ला लोहमार्गाने जोडणारा हा चिनाब नदीवरील प्रकल्प कात्रापासून ६५ किलोमीटर अंतरावर आणि कात्रा-धरम सेक्शनपासून ७३ किलोमीटर अंतरावर ३५९ मीटर उंचीचा होईल. १३१५ मीटर लांबीच्या या पुलासाठी २५ हजार टन स्टील वापरले जाईल, असेही कोकण रेल्वेचे कार्यकारी संचालक राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
३५९ मीटर उंचीला वार्‍याचा वेग ताशी २६५ किलोमीटर इतका होण्याची शक्यता आहे. चिनाब नदीवरील पुलावर जर वार्‍याचा वेग ताशी ९० किलोमीटर पेक्षा जास्त असल्यास पुलावरून रेल्वे जाण्यास परवानगी द्यायची नाही, असा निर्णय अभियंत्यांनी घेतला आहे. पुलावर स्वयंचलित दिव्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. जर वार्‍याचा वेग ९० किलोमीटर पेक्षा जास्त झाल्यास आपोआप लाल दिवा लागेल.

पुलाचे बांधकाम करणारे अभियंते आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. ७३ किलोमीटरच्या सेक्शनमध्ये ६३ किलोमीटरचे बोगदे बांधण्यात येणार आहेत. प्रकल्पाच्या जागी येण्यास कोकण रेल्वेने १७६ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्याचे ठरविले आहे. रेल्वेने या आधीच १०४ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधलेले आहेत.
मार्च २००७ पासून या पुलाचे बांधकाम सुरू झाले असून डिसेंबर २०१० पूर्ण होईल असे नियोजित होते. परंतु, नैसर्गिक आपत्तीमुळे विलंब होत गेला. आता हा प्रकल्प डिसेंबर २०१५ मध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment