नोटांवर दिसणार डॉ. आंबेडकर, शिवाजी महाराज, नेहरू व इंदिरा गांधी!

नवी दिल्ली, दि. १८ – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता नोटांवर महात्मा गांधींच्या प्रतिमेशिवाय इतर महत्वाच्या व्यक्तींची प्रतिमा छापण्याचा विचार करीत आहे. यामध्ये घटनेचे शिल्पकार भीमराव आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा समावेश आहे.

देशातील महान नेत्यांच्या योगदानाचे सदैव स्मरण व्हावे, यासाठी त्यांचे नाव एखाद्या योजनेला दिले जाते. त्यासाठी त्यांचे नाव, चित्र किंवा मूर्तीचा वापर केला जातो. त्यामुळे ते लोकांच्या स्मरणात राहतात आणि प्रेरणा देतात.

जवळपास सर्व क्षेत्रात या महापुरूषांना स्थान देण्यात आले आहे. परंतु, आतापर्यंत नोटांवरच यांना स्थान मिळाले नव्हते. फक्त महात्मा गांधींचाच फोटो नोटेवर पाहायला मिळतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला अनेक लोकांनी महात्मा गांधींशिवाय इतरांचीही प्रतिमा यावर यावी यासाठी सुचवले आहे. महात्मा गांधींशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज तसेच दोन माजी पंतप्रधानांच्या नावाची शिफारस केली आहे. यामध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा समावेश आहे.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिवस-रात्र एक करणार्‍या महात्मा गांधींनाच अत्तापर्यंत भारताच्या चलनी नोटांवर स्थान देण्यात आले आहे. आज आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीशी गांधीचे नाव या ना त्या मार्गाने जोडलेले आहेच. शहरे, कॉलीनी, रस्ते, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे सर्वच ठिकाणांना भारतीयांनी गांधीजींचे नाव देउन त्यांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाची जाणीव जागी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र, नोटांवर आजपर्यंत महात्मा गांधीनाच मान देण्यात आहे. गांधीजींचा फोटो नोटांवर छापणे हे गांधीजींच्या राहणीमानाविरुद्ध आहे. नोटांवर फोटो न छापल्याने गांधींना फारसा फरक पडला नसता, असे मानणारा ही काही लोकांचा गट आहे. १९८७ साली पहिल्यांदा ५०० रुपयांच्या चलनी नोटांवर गांधीजींचा फोटो छापण्यात आला होता. १९९६ नंतर सर्वच नोटांवर हसणारे राष्ट्रपिता दिसू लागले.

मात्र महात्मा गांधी नोटांवर येण्याआधी फक्त अशोक स्तंभच चलनी नोटांवरील प्रमुख घटक होता. महात्मा गांधींना चलनी नोटांवर कोणत्या सालापासून स्थान देण्यात आले आहे, याबाबत आरटीआय कार्यकर्ते मनोराजन रॉय यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून माहिती मागवली होती. मात्र या बदलासंदर्भात आरबीआयकडे कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापण्यात यावा, अशी शिफारस १९९३ साली रिझर्व बँक ऑफ इंडीयाच्या केंद्रीय बोर्डामार्फत करण्यात आली होती. नंतर ही शिफारस भारत सरकारने मान्य केल्यापासून गांधींचा फोटो नोटांवर छापण्यात येऊ लागला, अशी माहिती रिझर्व बँकेच्या प्रवक्त्यांनी दिली. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशातील इतर कोणत्याही गोष्टीला चलनी नोटांवर स्थान दिले जात नाही याबद्दल रॉय यांनी खंत व्यक्त केली. मुद्रा शास्त्राचे अभ्यासक असणार्‍या दिलीप राजगौर यांनी रॉय यांच्या मताशी सहमती दाखवत भारत हे अनेक शिल्पांचे, नृत्यप्रकारांचे, धर्मांचे, थोर शास्त्रज्ञांचे माहेरघर असताना आपण त्यांचा नोटांवर आणि नाण्यांवर छापण्यासाठी विचार का करु शकत नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोटांवरील आणि नाण्यांवरील डिझाइन तपासून पाहण्यासाठी मुद्रा शास्त्राचे अभ्यासकही उपलब्ध नसल्याचेही राजगौर यांनी सांगितले. काही आफ्रिकी देशांमध्ये नाण्यांवर महात्मा गांधींचे चित्र आहे, तर काहीं देशांच्या नाण्यांवर ताजमहलचे चित्र आहे. तसेच नेपाळच्या चलनी नाण्यांवर बुद्धांचे चित्र असल्याची माहिती राजगौर यांनी दिली.


काही विशिष्ट नेत्यांची चित्रे चलनांवर छापणे हे त्याराष्ट्रातील किंवा राज्यातील लोकांच्या भावनांवर अवलंबून असते आणि भारतही याला अपवाद नसल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर विमल जलान यांनी म्हटले आहे.