आघाडीतली यादवी

साधारणत: मराठी माणसे परस्परांचे पाय खेचण्यात आणि परस्परांची उणीदुणी काढण्यात वाकबगार असतात पण या खास मराठी गुणाचा प्रत्यय महाराष्ट्राच्या आघाडी सरकारमध्येच नित्य यावा याचे मोठे वैषम्य वाटते. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या दोन पक्षांचे हे सरकार पण या दोन मित्र पक्षांनी सध्या शपथ घेतल्यागत दररोज परस्परांना टोमणे मारायला सुरूवात केली आहे. यातून ज्येष्ठ नेते शरद पवार हेही सुटलेले नाहीत. त्यांना एके दिवशी महाराष्ट्रातले अनेक उद्योग बाहेर जात आहेत आणि नवे उद्योग महाराष्ट्रात येत नाहीत हे लक्षात आले. खरे तर ही स्थिती काही आजची नाही. खुद्द शरदराव मुख्यमंत्री असतानाही यापेक्षा काही वेगळी स्थिती नव्हती. पण ही गोष्ट त्यांना आता लक्षात आली. त्यांना ही गोष्ट खरेच नव्याने कळली की त्यांना या माहितीचा वापर करून मुख्यमंत्र्यांना टोमणा मारायचा होता हे काही कळले नाही; पण त्यांनी जाहीरपणाने ही गोष्ट सांगून महाराष्ट्राच्या औद्योगिक गती विषयी चिंता व्यक्त केली. यामागे चिंता किती आणि आपल्याच मित्र पक्षाला दूषण देण्याचा वसा किती हे काही कळले नाही. पण मुख्यमंत्र्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी लगेच पवारांना, काही आकडेवारी तर बघून बोलायला हवे असा सल्ला दिला.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यात कटुता निर्माण होईल अशी जाहीर वक्तव्ये कोणी करू नयेत असा आदेश देणारे पवार साहेबच काहीही न वाचता राज्याच्या कथित प्रगतीविषयी काही तरी जाहीरपणे बोलतात तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर चिडणे साहजिक होते. ते तसे चिडले. पवार झाले तरी आणि ज्येष्ठ नेते असले तरीही त्यांची भीड किती दिवस ठेवणार ? शेवटी ज्येष्ठांना मान मिळतो पण तो मागितल्याने मिळत नाही. तो आपल्या वागण्याने मिळवावा लागतो. पवारांनाही त्याचे भान राहिले नाही.  त्यामुळे मुख्यमंत्रीही मर्यादा सांडून पवारांना बोलले. पवारांनी मग मुख्यमंत्र्यांना उत्तर दिले पण त्याला काही अर्थ नव्हता. पवारांना नेमके कोणाला उद्देशून ते बोलायचे होते ते पवारांना माहीत पण तीर लागला तो भलतीकडेच.  पवारांच्या या हल्ल्याने अजित पवारच घायाळ झाले. एका दगडात दोन पक्षी मारण्यात प्रविण असलेल्या शरद पवारांनाही आपल्या या दगडाने घरचाच पक्षी जायबंदी होईल असे स्वप्नातही वाटले नसेल. पण तसे झाले. आधी मंत्रिमंडळातली यादवी राष्ट्रवादी विरुद्ध कॉंग्रेस अशी सुरू होती. कधी कधी ती दोन्ही पक्षातल्या गटांतही सुरू असे.

राष्ट्रवादीच्या दोन गटातही ती कधी चाले. आता या यादवीने पवार वि. पवार असे रूप धारण केले. एकदा पवार वि. पवार असा संघर्ष सुप्रिया सुळे वि. अजित पवार  असे हेवेदावे उघड झाले होते पण ती किरकोळ होते. त्यात विकासाचा किंवा खुर्चीचा मुद्दा गुंतलेला नव्हता. पण काका आणि पुतण्यातच विकासाच्या मुद्यावर जुंपली आणि पुतण्यानेच काकांना जबाब दिला. मुळात राज्यातल्या बाहेर जाणार्‍या कारखान्यांचे काय झाले याचा काही पत्ता लागला नाही. नंतर त्याची काही चर्चाही झाली नाही. विकासाच्या मुद्यावरच पण तो मुद्दा बाजूला ठेवून नेते भांडतात आणि भांडणाला नवा आयाम कसा देतात, याचा अनुभव या प्रकरणात आला. बाहेर जाणारे कारखाने कोणते आणि ते जाऊ नयेत यासाठी सरकारने मग काय केले याचा नंतर काहीही पत्ता लागला नाही. अशी लहान सहान भांडणे तर नित्यच सुरू आहेत. मुळात कॉंग्रेस पक्ष नेहमीच अंतर्गत भांडणांनी त्रस्त असतो. त्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस बाजूला काढली तरी शेवटी मूळ स्वभाव जात नाही. तो तसा जाऊ नये म्हणून कॉंग्रेस बाहेर पडून आपला पक्ष स्थापन करणारा प्रत्येक नेता आपल्या नव्या पक्षाचे नाव ठेवताना त्यात कॉंग्रेस हा शब्द आवर्जून ठेवत असतो. राष्ट्रवादीचे असेच झाले आहे. पण त्यांनी आपल्या नावात कॉंग्रेस शिल्लक  ठेवली असली तरी ते प्रत्यक्षात कॉंग्रेसचे कट्टर शत्रू आहेत आणि कॉंग्रेस सोबत आघाडीत असले तरीही ते कॉंग्रेस पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड मध्ये युवक कॉंग्रेसच्या चलो पंचायत या अभियानाची सुरूवात करताना,  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा कॉंग्रेसचा खरा वैरी आहे असा स्पष्ट इशारा दिला.

एवढेच थांबून ते थांबले नाहीत तर त्यांनी, हा आपला वैरी आपण ओळखला नाही तर यानंतर  महाराष्ट्रात आपल्याला सत्ता मिळणार नाही असा इशारा त्यांनी दिला. या दोन पक्षातली हमरातुमरी कोणत्या पातळीवर आली आहे हे दाखवणारा आणखी कोणता ठोस पुरावा हवा आहे ? अर्थात चव्हाणांनी असा इशारा दिला म्हणून कॉंग्रेसचे नेते आघाडी मोडणार नाहीत. कारण त्याना एक गोष्ट माहीत आहे की या कट्टर वैर्‍याला आता म्हणजे  अगदी आता जरी आपण ओळखले तरी आणि त्याला दूर ठेवायचे ठरवले तरी ते शक्य नाही कारण तसे केल्यास पुढे कधी तरी ऐवजी आताच आपल्याला हातातली सत्ता आताच सत्ता गमवावी लागणार आहे म्हणून ते आता या वैर्‍याला ओळखू शकत नाहीत. सत्ता हेच त्यांचे साध्य आहे. अगदी डाव्या आघाडीला सोबत घेऊनही ते सत्ता मिळवू शकतात.  तशी त्यांनी महाराष्ट्रात मिळवली आहे आणि खुद्द चव्हाणांनी या वैर्‍याच्या पाठींब्यावर दोन वेळा मुख्यमंत्रीपद भोगलेले आहे. प्रश्‍न वैर्‍याचा नाही. सत्तेचा आहे.

Leave a Comment