मुंबई दि. १६ – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन इब्राहीम कासकर उर्फ दाऊद याचा भाऊ मुस्तकीम इब्राहीम कासकर याने दुबई पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे. तसेच त्याने भारतात परतण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. आपल्या साथीदारांना सुरक्षितपणे भारतात पोहोचविण्यासाठी दाऊदनेच ही खेळी केल्याचे बोलले जात आहे.
दाऊदचे मुंबईतील वकील राजेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, आपण दाऊदच्या कुटुंबियांना मुस्तकीमच्या भारतात येण्याची शक्यता बोलून दाखविली आहे. त्याच्याविरोधात भारतात कोणताही गुन्हा दाखल नसल्यामुळे तो भारतात निश्चितच परतू शकतो. तसेच स्वदेशी येण्याचा आणि येथे निवास करण्याचा त्याला घटनादत्त अधिकार असल्याचेही श्रीवास्तव यांनी सांगितले.
दाऊदच्या भावाने केले दुबई पोलिसांकडे आत्मसमर्पण
या बातमीचे अद्याप अधिकृत सूत्रांकडून समर्थन करण्यात आलेले नाही. मात्र दाऊदचा एक भाऊ इक्बाल कासकर यापूर्वीच दुबईमार्गे भारतात दाखल झाला असून, आता दुसरा भाऊदेखील त्याच मार्गावर असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. २००५ साली इक्बाल कासकर दुबईतून भारतात दाखल झाल्यावर त्याला सारा-सहारा प्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. मात्र नंतर त्याची मुक्तता करण्यात आली होती, हे विशेष.
