मुंबई, दि. १६ जून, (हि.स.) – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासह पेडर रोडनिवासी उच्चभ्रू समाजाच्या विरोधामुळे गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या पेडर रोड उड्डाणपुलाच्या बांधकामाला लवकरच सुरूवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण (एमएसआरडीसी) पुढील आठवड्यात बांधकामाच्या निविदा मागविणार असल्याचे समजते.
एमएसआरडीसी च्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण विभागाची मान्यता मिळालेली असून, त्यामुळे आता या पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात त्याच्या बांधकामासाठी निविदा मागविल्या जातील. जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत या निविदांवर निर्णय होईल. या पुलाच्या बांधकामास सुमारे ३२० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दक्षिण मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणार्या पेडर रोड परिसरात लता मंगेशकर, आशा भोसले, मुकेश अंबानी आदी अनेक प्रतिष्ठित तसेच धनाढ्य नागरिकांची वस्ती आहे. दक्षिण व मध्य मुंबईला जोडणारा हा रस्ता मात्र अतिशय चिंचोळा असल्यामुळे येथे दररोज वाहनकोंडी होते. ही वाहनकोंडी फोडण्यासाठी तसेच गाडीचालकांचा वेळ आणि इंधन वाचविण्यासाठी येथे उड्डाणपूल बांधण्याची शिफारस एमएसआरडीसीतर्फे सुमारे १७ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्यावेळी राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार होते.
मात्र उड्डाणपुलाच्या या प्रस्तावाला स्थानिक उच्चभ्रूंनी पराकोटीचा विरोध करण्यास सुरूवात केली. हा उड्डाणपूल झाल्यास आमच्या खाजगी जीवनावर गदा येईल, असा येथील रहिवाशांचा सूर होता. तसेच या उड्डाणपुलावरून प्रवास करणार्या वाहनांमधून थेट शेजारच्या इमारतींमधील घरात डोकावणे शक्य होईल, असाही त्यांचा दावा होता. सार्या भारताचे ह्रदय आपल्या संगीतसुरांनी हेलावून टाकणार्या गानकोकिळा लता मंगेशकर व ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना पुढे करून पेडर रोड रहिवाशांनी या पूल उभारणीविरोधात आंदोलन पुकारले.
पेडर रोड उड्डाणपुल- निविदा पुढील आठवड्यात मागविणार
युतीची सत्ता जाऊन पुढे महाराष्ट्राला सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण असे मुख्यमंत्री लाभले. मात्र गेल्यावर्षी पर्यंत या प्रकल्पाचे घोंगडे सरकारदरबारी भिजत पडले होते. गेल्यावर्षी सर्वसामान्य मुंबईकरांच्या आग्रहामुळे या पुलासंदर्भात जनसुनावणीचे आयोजन केले. त्यातूनही या पुलाची निकड अधोरेखितच झाली. इतकेच नव्हे तर स्थानिकांच्या मागणीनुसार मूळ आराखड्यातही काही बदल करण्यात आले. त्यामुळे आता पुलास स्थानिकांच्या असलेल्या विरोधाची धार बोथट झाली आहे. परिणामी मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आता आधिकच पल्लवीत झाली आहे.
