राष्ट्रपतीपदाचा उमेदवार आज ठरण्याची शक्यता

गेल्या  अनेक दिवसापासून सुरु असलेला राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवारीबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम असला तरी याबाबतचा तिढा शुक्रवारी सुटण्याची शक्यता आहे. दोन्ही प्रमुख पक्षाची बैठक आयोजित करण्यात आल्याने आज हा सस्पेन्स दूर होणार आहे. राष्ट्रपती पदासाठी काँग्रेस प्रणीत आघाडीकडून केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचे तर भाजपकडून माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव आघाडीवर आहे.

बुधवारी राष्ट्रपती पदासाठी कॉंग्रेसकडून अर्थमंत्री प्रणव मुखर्जी व हमीद अन्सारी यांचे नाव पुढे करण्यात आले होते. मात्र ममतांनी या दोन्ही नावाला विरोध करीत या पदासाठी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना पहिली पसंती दर्शविली आहे तर या नावावर जर सहमती होणार नसेल तर पंतप्रधान मनमोहनसिंग अथवा लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांचे नाव पुढे करून कॉंग्रेस आघाडी पुढे नवाच पेच निर्माण केला आहे.

त्यामुळे आजच्या बैठकीत कोणाची वर्णीं लागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. दोन दिवसापासून हालचालीने वेग घेतला आहे. ममताशिवाय कॉंग्रेसकडून प्रणव मुखर्जी यांचे नाव पुढे करण्यची शक्यता आहे. दुसरीकडे भाजप नेते अडवानी यांनी जयललिता यांची भेट घेतल्याने कलाम यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.

एकीकडे दोन्ही प्रमुख पक्षाकडून नाव ठरत असतना मुखर्जी यांचे नाव सट्टेबाजात आघाडीवर आहे. जनतेची पसंती मात्र ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाला आहे

Leave a Comment