राष्ट्रपती निवडीत ममतांचा खोडा

नवी दिल्ली दि.१४- गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेला राष्ट्रपती पदाच्या निवडीचा पेच सुटेल असे वाटत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी यांनी  त्यात खोडा घातला आहे. सोनिया गांधीनी पुढे केलेले प्रणव मुखर्जीचे नाव ममताने टाळून आयत्या वेळी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे नाव पुढे करून कॉंग्रेस आघाडीची चांगलीच गोची केली आहे. त्यासाठी त्यानी समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांच्या नथीतून तीर मारला आहे.

सहमती घडवून आणण्यासाठी सोनिया गांधी यानी ममताशी चर्चा केली, मात्र या चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही. राष्ट्रपती पदासाठी कॉंग्रेसकडून अर्थमंत्री प्रणव मुखर्जी व हमीद अन्सारी यांचे नाव पुढे करण्यात आले होते. मात्र ममतांनी या दोन्ही नावाला विरोध करीत या पदासाठी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना पहिली पसंती दर्शविली आहे तर या नावार जर सहमती होणार नसेल तर पंतप्रधान मनमोहनसिंग अथवा लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांचे नाव पुढे करून कॉंग्रेस आघाडी पुढे नवाच पेच निर्माण केला आहे.

या सर्व प्रकारामुळे कॉंग्रेस आघाडी सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. राष्ट्रपती पदाची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे. मात्र अजून सर्व सहमतीने उमेदवार ठरला नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. या आधीच सरकारमधील घटक पक्ष असलेल्या अन्ना द्रमुकच्या नेत्या जयललीता यांनी पी.ए. संगमा यांचे नाव पुढे करून आघाडीत सर्व काही आलबेल नाही याची जाणीव करून दिली होती, परंतु ममताच्या नव्या राजकीय खेळीने सारेच समीकारणे आता बदलली आहेत.

राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी प्रणव मुखर्जीचे असलेले नाव वगळून ममताने काँग्रेससोबत प्रणव मुखर्जी यांना ही धक्का दिला आहे. काही दिवसापूर्वी त्यानी पश्चिम बंगालला अर्थिक मदत देताना त्यांनी अडथळा निर्माण केला होता त्याचा ममतांनी ही खेळी खेळून वचपा काढला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेच प्रणव मुखर्जीचे नाव चर्चेतून वगळण्यासाठी ही खेळी खेळली असावी अशी चर्चा सुरु आहे.

सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर ममतांनी लगेचच समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांची भेट घेऊन दोघांनी मिळून माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे नाव पुढे केल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. आता या पेचावर काँग्रेस आघाडी काय थोड्गा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाला कॉंग्रेस पूर्वानुभव पाहता पाठीबा देईल असे सध्या तरी वाटत नाही.

        

Leave a Comment