
काबूल दि.१२- अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांगात बसलेल्या भूकंपांच्या पाठोपाठच्या दोन धक्कयात किमान १०० नागरिक ठार झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. पाकिस्तानी सीमेजवळ असलेल्या या भागात सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास ५.४ आणि ५.७ रिश्टर क्षमतेचे दोन भूकंप झाले असून त्यात पर्वतरांगाचे कडे जवळच्या गावांवर कोसळल्याने तसेच भूस्खलन झाल्याने घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. यात मातीच्या ढिगार्याखाली किमान १०० लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात असून केवळ दोन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे असे समजते. या भागातील ३ जिल्हयात जमीन खचण्याचे प्रकार घडले असल्याने मनुष्य जिवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. एकच बुलडोझर उपलब्ध असल्याने ढिगारे हलविण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याचेही समजते.
