विस्डेन इंडिया अॅवार्ड मिळविणारा सचिन पहिला भारतीय खेळाडू

दुबईतील सोहळ्यात सचिनने विस्डेन इंडिया आऊट स्टँडिंग अॅवार्ड स्वीकारून आणखी एक विक्रम रचला आहे. असे अॅवार्ड पटकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. सचिन रेकॉर्डसाठी खेळतो अशी त्याच्यावर नेहमीच टिका केली जाते तसेच सचिनने शंभर शतके केली पण त्यातील बहुतेक वेळा भारताला पराभवच स्वीकारावा लागला अशीही टीका सचिनवर केली जाते. पण ५१ कसोटी आणि ४९ वन डे इंटरनॅशनल अशी १०० शतके झळकविणारा सचिन एकमेवाद्वितीयच आहे हे कोण नाकारणार?
 
गेली दोन दशके सचिन खेळतोय. मग त्याच्या नावांवर रेकॉर्ड असणारच आणि आकडेवारी पाहिली तर असे दिसते की कसोटीतील ५१ शतके झळकविताना भारत फक्त ११ मॅच हरला आहे आणि वनडेतील ४९ शतके झळकविताना भारताची १३ सामन्यांत हार झाली आहे. टीकाकारांची तोंडे कुणी धरायची हा प्रश्न आहेच मात्र दुबईत पार पडलेल्या या सोहळ्यात रत्नजडीत ट्रॉफी स्वीकारणारा सचिन मनात साठवून ठेवावा असाच. कारण इतका मोठा सन्मान मिळूनही सचिनचे पाय अजून जमीनीवरच आहेत हे त्याच्या वक्तव्यातूनच दिसून आले. या शंभर शतकातील अविस्मरणीय शतक कोणते असे विचारले असता तो म्हणतो, २००८ साली चेन्नईत इंग्लंडविरूद्ध खेळताना चौथ्या इनिंगला झळकविलेले शतक. त्याचे महत्त्व आगळे आहे कारण मुंबईवर झालेल्या हल्यानंतर हे शतक झळकविले आहे म्हणून.

Leave a Comment