माझ्याविरूद्ध पुरावे असतील तर दावा दाखल करा-शरद पवार

मुंबई दि. ११ – टीम अण्णांकडून आपल्यावर केले जाणारे भ्रष्टाचाराचे आरोप निखालस खोटे असल्याने आपण ते फेटाळून लावत आहोत असे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तेराव्या वर्धापनदिनानिमित्त बारामती, पुणे, मुंबई येथे अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिलेल्या पवार यांनी टीम अण्णांच्या आरोपाबाबत उत्तर देताना सांगितले की मी भ्रष्टाचारी असल्याचे पुरावे टीमअण्णांकडे असतील तर त्यांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल करावा. ते न्यायालयातही जाऊ शकतात मग ते हे का करत नाहीत? याचे उत्तर असे आहे की न्यायालयात त्यांची केस टिकणार नाही याची टीम अण्णाला पूर्ण कल्पना आहे.

टीम अण्णांनी केंद्रातील १४ मंत्र्यांविरूद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यात शरद पवार यांच्यावर २००७ साली गहू आयात प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्याविषयी सांगताना पवार म्हणाले की त्यावेळी गव्हाची प्रंचड टंचाई असल्याने गहू आयातीचा विचार केला गेला होता. पंतप्रधानांसोबत बैठकही झाली होती. मात्र आयातीची प्रक्रिया वाणिज्य मंत्रायलाकडे देण्यात आली होती. या मंत्रालयाने जागतिक बाजारात गव्हाचे दर उतरत असल्याची माहिती मिळविली होती व त्यामुळे दोन महिने थांबून गहू आयात करण्याचा निर्णय घेतला गेला. अर्थमंत्रालयालाही या गोष्टीची कल्पना देण्यात आली होती. मात्र अचानक अमेरिकन संशोधन संस्थांनी गहू उत्पादन घटले असल्याचे जाहीर करताच गव्हाच्या किंमती एकदम चढल्या. मात्र देशात गहू टंचाई असल्याने हा महाग गहूही आयात करण्याचा निर्णय घेतला गेला, त्यात कृषी मंत्रालयाचा काही संबंध नव्हता.

केंद्र सरकारने पेट्रोल किंमतीत केलेल्या भरमसाठ वाढीविषयी नाराजी व्यक्त करून पवार म्हणाले की, आपण पूर्वीपासूनच सरकारला तेल कंपन्या जेव्हा दरवाढ मागतील तेव्हा थोडी थोडी दरवाढ करावी असे सांगत होतो. प्रत्येक वेळी थोडी दरवाढ केली असती तर आता करावी लागली तशी भरमसाठ दरवाढ करण्याची पाळी आली नसती. पण कुठल्याच सरकारला अप्रिय निर्णय घेणे मान्य नसते. दुर्देवाने या बाबत माझा अंदाज खरा ठरला आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी असले अप्रिय निर्णय घ्यावेच लागतात व त्यामुळे असले दरवाढीचे शॉक टाळताही येतात असेही ते म्हणाले.

Leave a Comment