भारतीय आंब्याची अमेरिकेला मोहिनी

मुंबई दि.८-अप्रतिम स्वाद, अवीट रूची आणि मन मोहविणार्‍या वासाने परिपूर्ण असलेल्या भारतीय हापूस आणि केशर आंब्याने अमेरिकन जनतेला मोहिनी घातली असून यंदा सुमारे १३० टन आंबा अमेरिकेला निर्यात केला जात आहे. पैकी ९१ टन आंबा अमेरिकेत यापूर्वीच पोहोचला असून बाकी अमेरिकेच्या वाटेवर असल्याचे अपेडाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. यंदा आंबा निर्यातीत ४३ टक्के वाढ झाली असून गतवर्षी ९० टन आंबा अमेरिकेत निर्यात करण्यात आला होता असेही हे अधिकारी म्हणाले. जपानकडूनही भारतीय आंब्याची मागणी वाढत चालली असल्याचे समजते.

आंबा हे नाशवंत फळ आहे. त्यामुळे दूरदेशी निर्यात करताना आंब्यावर विकरण प्रक्रिया करून मगच तो निर्यात केला जातो. या प्रक्रियेमुळे आंब्याच्या कोयीला कीडसंसर्ग होत नाही तसेच आंबा अधिक काळ टिकणेही शक्य होते. सध्या नाशिक जिल्ह्यात एकाच ठिकाणी हे प्रक्रिया केंद्र आहे त्यामुळे प्रक्रिया करण्यास मर्यादा येते. आंबा उत्पादक जिल्ह्यांच्या ठिकाणी अशी प्रक्रिया केंद्रे सुरू केली गेली तर आंबा निर्यात ३०० टनांचा टप्पाही ओलांडू शकेल असा विश्वास या अधिकार्‍यांनी व्यक्त केला. सध्या फक्त हापूस आणि केशर जातीचा आंबाच निर्यात केला जात असल्याचे ते म्हणाले. २००७ सालापासून आंबा अमेरिकेत निर्यात केला जात आहे.यंदा पोषक हवामान मिळाल्याने आंब्याची प्रत उत्तम आहे. त्यामुळे निर्यात करणेही सुलभ झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.