गर्भलिंग चाचणी करणार्‍या सोनोग्राफी सेंटर्सवर कायमची बंदी

मुंबई दि.८-गर्भलिंग चाचण्या करून अवैधरित्या केल्या जात असलेल्या स्त्रीभ्रूण हत्यांना कायमचा आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीर रित्या अशा चाचण्या करणार्‍या सर्व सोनोग्राफी सेंटर्सना कायमचे टाळे लावण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरवात बीड जिल्ह्यापासून केली जात असून टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी आणि बेकायदेशीर सोनोग्राफी सेंटर्स बंद करण्यात येतील असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

परळीतील डॉ.सुदाम मुंडे प्रकरण आणि त्यानंतर गेल्या दोन आठवड्यात बीड जिल्ह्यात स्त्रीभ्रूण गटारात टाकल्याच्या उघडकीस आलेल्या घटनांमुळे शासनाला हा निर्णय तातडीने घ्यावा लागला असल्याचे समजते. सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी करण्यासाठी विशेष पथकही नियुक्त करण्यात आले आहे. परळीतील डॉ.सुदाम मुंडे आणि डॉ.सरस्वती मुंडे हे गेले दोन दशके स्त्रीभ्रूण हत्या करत असल्याचे एका स्वयंसेवी संस्थेने स्टींग ऑपरेशनमधून उघडकीस आणले होते मात्र राजकीय वरदहस्तामुळे मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. आत्ताही विजयमाला पालकर या महिलेचा गर्भपात करताना तिला मृत्यू आल्यानंतर डॉ.मुंडे दांपत्याला अटक करण्यात आली मात्र ताबडतोब त्यांची जामीनावर सुटका झाली आणि आता हे दोघेही फरारी आहेत.

या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉ.मुंडे यांच्याकडे कर्नाटक व आंध्रातूनही महिला गर्भलिंग चिकित्सेसाठी येत असत. डॉ.सरस्वती मुंडे सोनोग्राफी करून गर्भ मुलाचा की मुलीचा ते सांकेतिक आकड्यात फाईलवर लिहित असत. फाईलवर १६ आकडा असल्यास मुलगा आणि १९ आकडा असल्यास मुलगी असा हा संकेत होता. १९ आकडा असल्यास ताबडतोब संबंधित महिलेला डॉ.सुदाम मुंडे दवाखान्यात दाखल करत आणि तेथे तिचा गर्भपात केला जात असे. अशा प्रकारे दररोज सरासरी दोन डझन गर्भपात केले जात असत असेही या कार्यकर्त्याने सांगितले. बीड जिल्ह्यात मुंडेंसारखेच काम करणारे अनेक डॉक्टर्स असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment