मंत्र्यांच्या विरोधात पुरावे दिल्यास दखल घेवू – मुख्यमंत्री

मुंबई, दि. ७ – राज्य मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याबाबत आपल्याकडे पुराव्यासह तक्रारी दाखल झाल्यास त्याची दखल घेता येईल. मात्र, प्रसारमाध्यमातून केल्या जाणार्‍या आरोपांमधून पुरावे मिळत नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जलसंपदा मंत्र्यांवरील आरोपाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांनी आपल्या कुटुंबियांच्या नावे कृषी विकास कंपन्यांकडून हजारो एकर जमिनी बळकावल्या प्रकरणी गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात आरोप केले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर गुरूवारी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांकडे विचारणा केली असता त्यांनी पुराव्यासह तक्रार केल्यास दखल घेता येईल असे उत्तर दिले.

राज्यातील उद्योग बाहेर स्थलांतरीत होत असल्याबाबत केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या धोरणामुळे उद्योग बाहेर जात असल्याबाबतचे आरोप फेटाळले. ते म्हणाले की, व्हॅट कराचा १०० टक्के परतावा देण्याच्या सवलतीचा काही उद्योगांनी गैरफायदा घेतल्याचे लक्षात आल्यावर वित्त विभागाने त्याबाबत निर्बंध करणारी दुरूस्ती संबंधीत कायद्यात केली. त्यानंतर अशा उद्योगांनी गाशा गुंडाळला. त्याचा दोष राज्याच्या उद्योग धोरणाला देता येणार नाही. जुन्या धोरणात ज्या सवलती दिल्या जात आहेत. त्यांचा फेरआढावा घेवून नव्या धोरणात त्या सुधारल्या जातील, असेही ते म्हणाले.

Leave a Comment