स्त्री भ्रूण हत्येची माहिती द्या.. २५ हजार मिळवा

मुंबई, दि. ५ – परळीमध्ये डॉ. मुंडे रूग्णालयामध्ये स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार घडल्याची घटना ताजी असतानाच बीड शहरात आणखी दोन स्त्री अर्भकांना नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्याच्या अनेक भागांतूनही अशा प्रकारे घटना घडत असल्याचे निदर्शनास आले असल्याने स्त्री भ्रूण हत्येचा प्रकार केवळ परळी किंवा बीडपर्यंत मर्यादित नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्य शासनाचा आरोग्य विभागा आता खडबडून जागा झाला असून स्त्री भ्रूण हत्या टाळण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाण सार्वजनिक आरोग्य विभागाने एक हेल्पलाईन सुरू केली आहे. कुठेही अशा प्रकारचे स्त्री भ्रूण हत्येचे कृत्य घडले असेल त्याची माहिती या हेल्पलाईनवर द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईलच, पण ती घटना खरी असेल तर त्याला २५ हजार रूपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आतापर्यंत १८००-२३३४४७५ या हेल्पलाईनवर संपूर्ण महाराष्ट्रातून दहा जणांनी, अशी माहिती दिली असून त्यांना प्रत्येकी २५ हजार रूपये देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सांगितले. या हेल्पलाईन सुविधेमुळे तरी स्त्री भ्रूण हत्येच्या प्रकारांना आळा बसेल असेही त्यांनी सांगितले.