विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका २ जुलै रोजी

मुंबई, दि. १ – विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या दोन जागांसाठी आणि शिक्षक मतदार संघाच्या दोन जागांसाठी २ जुलै रोजी मतदान होत आहे. पदवीधर मतदार संघाच्या मुंबई आणि कोकण तसेच शिक्षक मतदार संघाच्या नाशिक व मुंबई या जागांसाठी निवडणुका घेण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केले. विधानपरिषदेतील या चार सदस्यांची मुदत ७ जून रोजी संपत आहे. त्यासाठी २ जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना ८ जून रोजी निघणार असून १५ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्जांची छाननी १६ जून रोजी होईल, तर १८ जून पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. प्रत्यक्ष मतदान २ जुलै रोजी होणार असून मत मोजणी ४ जुलै रोजी होऊन निकाल जाहीर होतील.

कोकण पदवीधर मतदार संघासाठी भाजपाने विद्यमान आमदार संजय केळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानपरिषदेचे उपाध्यक्ष वसंत डावखरे यांचे चिरंजीव निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. डावखरे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचेच निलेश चव्हाण मैदानात उतरणार असल्याचे समजते.

गेल्या निवडणुकीत निलेश चव्हाण यांनी भाजपाचे संजय केळकर यांना अत्यंत चुरशीची टक्कर दिली होती. निलेश चव्हाण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत.
 
मुंबई पदवीधर मतदार संघासाठी शिवसेनेने विद्यमान आमदार दीपक सावंत यांनाच उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या विरोधात अद्याप कॉंग्रेस अगर राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार जाहीर केलेला नाही.

शिक्षक मतदार संघाच्या मुंबईच्या जागेसाठी शिक्षक भारतीचे विद्यमान आमदार कपिल पाटील हेच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शरद यादव, अपक्ष उमेदवार प्रा. डॉ. मनिषा कायंदे, तर मनसेतर्फे संजय चित्रे हे उमेदवारी अर्ज भरण्याची दाट शक्यता आहे. नाशिकच्या शिक्षक मतदार संघासाठी मात्र अद्याप कोणत्याही राजकीय पक्ष वा संघटनेने उमेदवार जाहीर केलेला नाही. तथापि विद्यमान आमदार दिलीप सोनवणे हे या मतदार संघाचे प्रबळ दावेदार मानले जातात.

Leave a Comment