लष्कर आणि संरक्षण मंत्रालयामध्ये गैरसमज नाहीत-लष्करप्रमुख सिंग

पुणे दि.३०-लष्कराची तिन्ही दले कोणतेही आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज आणि समर्थ आहेत असे लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या पासिंग आऊट परेडला उपस्थित राहिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जनरल सिंग उद्या निवृत्त होत असून लष्करप्रमुख म्हणून त्यांचा हा शेवटचाच मोठा समारंभ होता.

जनरल सिंग यांनी यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. ते म्हणाले की लष्कर आणि संरक्षण मंत्रालय यांच्यात कोणतेही गैरसमज नाहीत. आम्ही जे सांगतो, त्याची दखल मंत्रालयाकडून घेतली जाते. अर्थात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कांही प्रक्रिया पार पाडाव्या लागतातच. आपले संरक्षण मंत्री लष्कराच्या मदतीसाठी सदैव तप्तर आहेत तसेच आपली तिन्ही दले देशावरचे कोणतेही आक्रमण मोडून काढण्यास समर्थ आहेतच पण त्यांना आधुनिकीकरणाची जोड मिळाली तर ती अधिक बळकट होतील. लेफ्टनंट जनरल तेजिदर सिंग यांच्या तक्रारीविषयी बोलणे मात्र त्यांनी यावेळी टाळले.

पत्रकार परिषदेपूर्वी एनडीएच्या पासिंग आऊट परेडनंतर कॅडेटना संदेश देताना ते म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी आपले प्रोफेशन आणि जबाबदारी पणाला लावू नका. भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे आणि तुम्हीच भविष्याचे खरे शिल्पकार असणार आहात. देशाचे भवितव्य तुमच्याच हाती आहे आणि ते सुरक्षित राहील हे पाहणे ही तुमची जबाबदारी आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लिहिलेल्या पत्रावरून जनरल सिंग यांच्याबाबत वादाचे मोहोळ उठले होते. सैन्याकडे दारूगोळा कमी आहे आणि अत्याधुनिक शस्त्रेही कमी आहेत हे त्यांचे पत्र प्रसारमाध्यमांना उपलब्ध झाल्यावरून हे वादंग माजले होते.

Leave a Comment