’एक्सयूव्ही ५००’ चे ८ जूनपासून बुकिंग

मुंबई, दि. २९ – स्पोर्टस् कार प्रकारातील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या महिन्द्रा अॅण्ड महिन्द्राच्या ’एक्सयूव्ही ५००’ चे बुकिंग पुन्हा एकदा पुढच्या महिन्यात ८ जूनपासून सुरू होणार आहे. उत्पादनापेक्षा मागणी मोठी असल्याने कंपनीकडून जानेवारीमध्ये लॉटरी पद्धतीने ’एक्सयूव्ही’ ची विक्री केली होती. आता पुन्हा एकदा या कारचे बुकिंग सुरू करण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये या कारचे उत्पादन वाढविण्यात आले आहे. यामुळे देशभरातील मागणी पूर्ण करणे शक्य होईल, असा विश्वास कंपनीच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शहा यांनी व्यक्त केला. चाकणमधील प्रकल्पातून दरमहा तीन हजार ’एक्सयूव्ही’ उत्पादित केल्या जातात. मात्र वाढती मागणी लक्षात घेत उत्पादन चार हजारपर्यंत वाढविण्यात आले असल्याचे शहा यांनी सांगितले.

येत्या ८ तारखेपासून या कारचे बुकिंग सुरू करून देशातील आणखी १९ शहरांमध्येही ’एक्सयूव्ही ५००’ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कंपनीने सप्टेंबरमध्ये ’एक्सयूव्ही ५००’ बाजारात आणली होती. त्यानंतर चार महिन्यांत उत्पादित झालेल्या आठ हजार कारची केवळ १० दिवसांत विक्री झाली होती. त्यानंतर कंपनीने काही महिने या कारचे बुकिग बंद केले होते.