पालखी मुक्कामस्थळाचे भूसंपादन होणार

पंढरपूर, दि.२९ – पालखी मार्गावरील पालखी मुक्कामस्थळाचे भूसंपादन करणार असल्याची घोषणा, पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली. आषाढी यात्रेच्या नियोजनाची बैठक जगद्गुरू श्रीसंत तुकाराम भवन येथे घेण्यात आली त्यावेळी मार्गदर्शन करताना ढोबळे बोलत होते.

या बैठकीत भाविकांनी पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढावीत अशी सूचना केली. भाविकांच्या सोयीसाठी २१ जून ते ७ जुलै कालावधीत श्रीविठ्ठल मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. एका दिवसात पददर्शनातून ५२ हजार तर मुखदर्शनातून ३० हजार भाविकांची दर्शन घेण्याची व्यवस्था मंदिर समितीने केली आहे. श्रीसंत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याबरोबर ४०० दिंड्या असून यामध्ये तीन लाखाहून अधिक भाविक सहभागी होतात. तर जगदगुरु श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात २७५ दिड्यांचा समावेश आहे. दोन लाख भाविक पालखी सोहळ्यात आहेत असे सांगून ढोबळे म्हणाले. सोलापूर जिल्ह्यात श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २४ जून तर जगदगुरु श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा २५ जून रोजी सुरू होणार आहे. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील १२ गावात तर जगदगुरु श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा आठ गावातून येणार आहे. या गावातील ग्रामपंचायतींनी पालखी तळ स्वच्छ ठेवून आलेल्या भाविकांना पाणी, आरोग्य, वीज अशा सुविधा द्याव्यात.

यावेळी आयुक्त प्रभाकर देशमुख म्हणाले, पालखी मुक्काम स्थळाची जमीन भूसंपादित करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून पालखी मार्गावर सर्वसोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पंढरपूर-देहु-आळंदी तीर्थक्षेत्र विकासासाठी शासनाने ५०० कोटी रूपये मंजूर केले आहेत. टप्प्याटप्प्याने विकास कामे करण्यात येणार आहेत. भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी नगरपरिषद यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment