भारताचे ओबामा ?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अचानकपणे उतरलेले ईशान्य भारतातील राष्ट्रवादीचे नेते पी. ए. संगमा यांची उमेदवारी गांभीर्याने घेण्यास अजून तरी कोणी तयार झालेले नाही. मात्र स्वतः पी.ए. संगमा भलतेच आशावादी आहेत आणि त्यांनी आपण अचानकपणे चमत्कार घडवत विजय मिळवू, असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. तो कितपत सार्थ आहे हे आताच सांगता येणार नाही. मात्र अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक ओबामा जसे अचानकपणे निवडून आले तसे आपण भारताच्या राष्ट्रपतीपदावर निवडून येऊ, अशी तुलना त्यांनी केलेली आहे.

खरे म्हणजे  ओबामा हे कृष्णवर्णीय आहेत तरीही ते निवडून येऊ शकणार नाहीत, असे कोणी म्हटलेले नव्हते. किबहुना पी.ए. संगमा निवडून आलेच तर त्यांची ही निवड जेवढी अनपेक्षित असेल तेवढी ओबामांची निवड निश्चितच अनपेक्षित नव्हती. ओबामा यांना अमेरिकेतल्या दोन पैकी एका मोठ्या पक्षाचा अधिकृत पाठींबा होता. सुरुवातीच्या काळात त्यांची उमेदवारी कोणी गांभीर्याने घेतली नव्हती ही गोष्ट खरी. पण नंतरच्या फेर्‍यांमध्ये त्यांच्या निवडून येण्याची शक्यता वाढत गेली होती आणि शेवटी ते निवडून सुद्धा आले.

अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक आणि भारताची राष्ट्रपतीपदाची निवडणूक यामध्ये खूप फरक आहे. तो सगळा फरक येथे स्पष्ट करण्याची गरज नाही. मात्र एवढे निश्चितपणे सांगता येते की, ओबामांची निवडणूक आणि संगमा यांची निवडणूक यामध्ये कसलीही तुलना करणे आणि साम्य दाखवणे हे सर्वथैव अनुचित आहे. मात्र एक गोष्ट मान्य केली पाहिजे की, ही निवडणूक तोंडावर आली असतानाच पी.ए. संगमा यांनी या निवडणुकीच्या मैदानात उडी घेऊन या निवडणुकीतली रंगत काहीशी वाढवली आहे.

खरे म्हणजे ही निवडणूक नेमकी कशी होणार, याविषयी खूप उत्सुकता दाटून आली होती. प्रणव मुखर्जी, हमीद अन्सारी, ए.पी.जे. अब्दुल कलाम आदी नावांवर घनघोर चर्चा सुरू होती. ममता बॅनर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या नावावर बर्‍यापैकी सहमतीही दर्शविली होती आणि भारतीय जनता पार्टीही त्यांच्या नावाला सहमती दर्शवील अशी शक्यता वाटायला लागली होती आणि संसदेच्या परिसरात मुखर्जी यांच्याकडे भावी राष्ट्रपती म्हणून बघितले जायला लागले होते. अशा परिस्थितीत पी.ए. संगमा यांचे नाव एकदमच पुढे आले. प्रणव मुखर्जी यांचे नाव मागे पडले. कारण त्यांच्या निवडीमध्ये काही अडचणी आहेत.

जयललिता यांनी संगमा यांच्या नावाची सूचना करून या निवडणुकीत खळबळ उडवून दिली आहे आणि पी.ए. संगमा हे उत्तम राष्ट्रपती होतील, अशी त्यांची प्रशंसा केलेली आहे. यात फार मोठी चूकही नाही. संगमा हे कितीही चांगले उमेदवार असले तरी त्यांचे निवडून येणे किवा न येणे हे त्यांना कोणत्या पक्षांचा पाठींबा मिळतोय यावर अवलंबून राहणार आहे. तूर्तास तरी त्यांच्यामागे अण्णा द्रमुक आणि बिजू जनता दल हे दोन पक्ष उभे राहतील असे दिसत आहे.

बाकी कोणताही मोठा पक्ष त्यांच्यामागे उभे राहण्याच्या मनःस्थितीत नाहीत. पी.ए. संगमा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. पण अजून तरी शरद पवार यांनीच संगमा यांच्या उमेदवारीबाबत कानावर हात ठेवलेले आहेत. आपल्याला संगमा यांच्या उमेदवारीची माहिती नाही आणि याबाबत खुद्द श्री. संगमा आपल्याशी बोललेले नाहीत, असे पवार यांनी म्हटले आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनेच संगमा यांची उमेदवारी उचलून धरलेली नाही, मग संपु आघाडीचा तर प्रश्नच नाही. किंबहुना संपु आघाडी त्यांच्या उमेदवारीची शिफारस करण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. कारण पी.ए. संगमा सोनिया गांधी यांचे कट्टर विरोधक आहेत, तसे  ते स्वतःला अभिमानाने म्हणवून घेतात. अशा स्थितीत संगमा यांच्या पाठीशी संपु आघाडी उभी राहणार नाही. अन्य पक्षांचाही फारसा उत्स्फूर्त पाठींबा नाही.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी आवश्यक असलेला राजकीय पक्षांचा पाठींबा त्यांच्या मागे म्हणावा तसा उभा नाही. त्यांचा सारा भर आपण आदिवासी आहोत या गोष्टीवर आहे आणि आपल्याला आदिवासी म्हणून निवडणूक जिकता येईल, अशी त्यांची कल्पना आहे. देशभरामध्ये विविध विधानसभांत कार्यरत असलेले आदिवासी आमदार, लोकसभा आणि राज्यसभेतले आदिवासी खासदार आपल्या पाठीशी उभे राहतील, अशी आशा त्यांना वाटत आहे. त्यांचे आदिवासी असणे हेच भांडवल आहे, अशी त्यांची भावना आहे.

मात्र आजवरच्या इतिहासावर नजर टाकल्यास कोणीतरी आदिवासी म्हणून, केवळ दलीत म्हणून किवा केवळ मुस्लीम म्हणून राष्ट्रपतीपदावर निवडून आलेला आहे असे काही दिसलेले नाही. अनेक मागासवर्गीय, मुस्लीम उमेदवार राष्ट्रपती झालेले आहेत, पण त्यांना पक्षांचा पाठींबा होता. ते एकांडे शिलेदार नव्हते. काही वेळा तर असा जातीचा आधार घेऊन उभे असलेले राजकीय पक्षांचे उमेदवार सुद्धा पराभूत झालेले आहेत. लोक संगमा यांना छुपा पाठींबा देतील, असा त्यांना विश्वास वाटत आहे. परंतु लोकांनी छुपा पाठींबा द्यावा एवढे संगमा यांचे कर्तृत्व नाही.