चिदंबरम माझे बॉस नाहीत – पर्रीकर

पणजी,दि. २९ – गोव्यासाठी आयएएस व आयपीएस अधिकार्‍यांची नेमणूक करताना तसेच विद्यमान अधिकार्‍यांना मुदतवाढ देताना राज्य सरकारला विश्‍वासात न घेतल्याबद्दल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाविरूध्द तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘मला न विचारता हे सर्व करणारे पी. चिदंबरम कोण?’ असा सवालही त्यांनी केला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने अलिकडेच अनेक आयपीएस अधिकार्‍यांच्या नेमणुकांची यादी राज्य सरकारला पाठवली आहे. मात्र, राज्य सरकारशी चर्चा न करता अशा थेट नेमणुका करण्याचा अधिकार केंद्रीय गृहमंत्रालयाला कोणी दिला? असा सवालही त्यांनी केला. आपले सरकार ही दादागिरी कदापी सहन करणार नाही. ‘पी. चिदंबरम माझे बॉस नाहीत, येथे सगळे समान आहेत’, असे संतप्त उद्गारही त्यांनी यावेळी काढले. गोव्यासाठी स्वतंत्र आयएएस आणि आयपीएस अधिकार्‍यांचा कॅडर निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना आपण मुख्य सचिवांना दिल्या आहेत, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.