सिंचनाची श्‍वेतपत्रिका या महीनाअखेरीला होणार

पुणे :  राष्ट्रीय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही सत्ताधारी पक्षांमधे कुरघोडीच्या राजकारणाचे कारण ठरलेली सिंचनाची श्‍वेतपत्रिका या महीनाअखेरीला प्रसिध्द होणार असून त्यात राष्ट्रवादीने आपल्या अखत्यारीत असलेल्या जलसंधारण विभागाने तब्बल १२ लाख हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आणल्याचा दावा केल्याचे जलसंधारण विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

राज्यात सुमारे ७० हजार कोटी रूपये खर्च करूनही सिंचनाखालील क्षेत्रात केवळ ०.१ टक्के वाढ झाल्याचे शासनाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात दिसून आले आहे. या आकडेवारीचा आधार घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अखत्यारीत असलेल्या जलसंपादन विभागावर शरसंधान करून याबाबत श्‍वेतपत्रिका प्रसिध्द करण्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केली.

राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत सहभागी असले तरीही प्रत्यक्षात त्यांच्यातून विस्तव जात नाही ही वस्तुस्थिती आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कॉंग्रेसवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

राष्ट्रवादीला पायबंद घालण्यासाठी राज्यातील कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री आणि संघटनात्मक प्रमुख असलेल्या प्रदेशाध्यक्षांनी आक्रमक असणे कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने आवश्यक केले आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे आपली मूळ प्रकृती बाजूला ठेऊन राष्ट्रवादीच्या कुरघोडीवर वरकडी करण्याची संधी साधत आहेत. आर्थिक सर्वेक्षणातील ०.१ टक्के सिंचनक्षेत्राच्या उल्लेखामुळे चव्हाण यांना ही संधी लाभली आणि त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा उठवला. त्यानी सिंचनाबाबतीत श्‍वेतपत्रिका सादर करण्याची घोषणा करून अजित पवारांवर कडी केली.

आता राष्ट्रवादीनेही मुख्यमंत्री चव्हाणांवर मात करण्याची तयारी केली असून त्यादृष्टीने चव्हाण यांच्या घोषणेनुसार सिंचनक्षेत्राची श्‍वेतपत्रिकाही तयार केली आहे. ही श्‍वेतपत्रिका ३० तारखेला विधीमंडळाच्या पटलावर सादर केली जाईल असे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. ज्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा आधार घेऊन मुख्यमंत्री चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर नेम साधला त्याच श्‍वेतपत्रिकेत राज्यातील १० ते १२ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आल्याचे सूचित केल्याचा दावा करून राष्ट्रवादीने आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले.        

Leave a Comment