नौदलाच्या जहाजांना स्वदेशी बनावटीचे कवच

पुणे, दि.२४ – नौदलाच्या जहाजांना धोका पोहोचविणार्‍या शत्रूची जहाजे उदध्वस्त करणारे कवच हे संपूर्ण देशी बनावटीचे चॅफ रॉकेट खडकी येथील ऍम्युनिशन फॅक्टरीने विकसित केले आहे. तीन विविध प्रकारच्या रॉकेटबरोबरच शत्रूचे सबमरीन नष्ट करणारे मिसाईल लॉंचर (अँटी सबमरीन रॉकेट सिस्टिम) देखील विकसित करण्यात आले आहे.

अम्युनिशन फॅक्टरी येथे झालेल्या कार्यक्रमात फॅक्टरीचे वरिष्ठ सरव्यवस्थापक बी. एन. सिंह यांनी नौदलाकडे कवच रॉकेटचे हस्तांतरण केले. नेव्हल अर्मामेंट इन्स्टिट्यूटचे महासंचालक रिअर ऍडमिरल  ब्रिजेश झांग यांच्यासह त्यांनी रॉकेट असलेल्या वाहनाला झेंडा दाखविला.

बी. एन. सिंह म्हणाले, नौदलासाठी आवश्यक असलेल्या या रॉकेटचा पुरवठा यापूर्वी रशिया येथून होत असे. मात्र, रशियाच्या विघटनानंतर हा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या रॉकेटची निर्मिती करण्यामध्ये स्वयंपूर्ण व्हावे ही काळाची गरज होती. ऍम्युनिशन फॅक्टरीने तीन वर्षांपासून सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. या रॉकेटसाठी आवश्यक असलेला वायजीबी ६० हा फ्यूज तयार करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. या फ्यूजचे डिझाईन आणि उत्पादन ही प्रक्रिया खडतर स्वरुपाची होती. रशियातून हा फ्यूज भारतामध्ये आणण्यासाठीचा वाहतुकीचा खर्च चार लाख रुपये होता. संपूर्णपणे देशी बनावटीचा फ्यूज तयार करण्यासाठीचा खर्च केवळ ५० हजार रुपये आला आहे.

तीन वेगवेगळ्या अंतरावरील जहाजांचा वेध घेणारे हे चॅफ रॉकेट आपल्या देशातच निर्माण व्हावे ही नौदलाची गरज आहे. लघुत्तम रॉकेट एक किलोमीटर अंतरावरील शत्रूच्या जहाजाला नष्ट करू शकते. मध्यम पल्ल्याच्या रॉकेटमध्ये पाच किलोमीटर अंतरावरील तर, लांब पल्ल्याच्या रॉकेटमध्ये १५ किलोमीटर अंतरावरील शत्रूच्या जहाजाचा वेध घेण्याची क्षमता आहे. आगामी पाच वर्षांत नौदलासाठी पाच हजार रॉकेटची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे. यामुळे ऍम्युनिशन फॅक्टरीच्या उत्पन्नामध्ये दरवर्षी शंभर कोटी रुपयांची भर पडणार आहे. भविष्यात या रॉकेटची क्षमता वाढवून ती अधिकाधिक परिणामकारक करण्यासाठीचे संशोधन सुरू असल्याची माहिती बी. एन. सिंह यांनी दिली.

रिअर ऍडमिरल ब्रिजेश झांग म्हणाले, रशियाच्या विघटनानंतर रॉकेटच्या विकसनामध्ये स्वयंपूर्ण व्हावे यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) यासाठी पुढाकार घेतला असून त्याला ऍम्युनिशन फॅक्टरीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संपूर्ण देशी बनावटीच्या कवच रॉकेटची निर्मिती झाल्यामुळे नौदलाची वाढती गरज पूर्ण होणार आहे.