गुलाबराव देवकर यांना डच्चू तर मोहिते-पाटील यांचे पुनर्वसन

मुंबई, दि.२३ मे – जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी पक्षाकडे आधीच देउन ठेवलेला राजीनामा स्वीकारण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी  काँग्रेसच्या सूत्रांकडून समजते. तर देवकर यांच्या जागेवर विजयसिह मोहिते-पाटील यांचे पुर्नवसन करण्यात येणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

२००९ साली पंढरपूर मतदार संघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे भानुदास भालके यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले विजयसिह मोहीते-पाटील गेले तीन वर्ष सत्तेपासून दूर आहेत. मात्र, त्यांना राज्यपाल नियुक्त जागेवर विधान परिषदेत पाठवून राष्ट्रवादी  काँग्रेस नेत्याचे काही प्रमाणात राजकीय पुनर्वसन केले आहे. थोरल्या पवारांचे आणि मोहीते-पाटील यांचे जिव्हाळयाचे संबंध असल्याने आता गुलाबराव देवकर यांचा राजीनामा स्वीकारून त्यांच्या जागी मंत्रिमंडळात मोहीते-पाटील यांची वर्णी लावावी, असा निर्णय राष्ट्रवादी  काँग्रेसने घेतल्याचे समजते.

गुलाबराव देवकर यांना सध्या जामीन मिळाला असला तरी त्यांच्यावर जळगाव घरकुल घोटाळ्याची टांगती तलवार असणार आहेच. त्यामुळे आगामी निवडणुकीत देवकर यांना मंत्रिपदावर कायम ठेवल्यास फटका बसण्याची तसेच विरोधी पक्षांकडून आणि काँग्रेसकडून याचे भांडवल केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 

Leave a Comment