अमेरिकेच्या मिशेलनी दिले फ्रान्सच्या फर्स्टलेडीला कानमंत्र

वॉशिंग्टन – व्हेलरी ट्रायरवेलर फ्रान्सच्या नवनियुक्त फर्स्ट लेडींना अमेरिका भेटीत अमेरिकेच्या फर्स्टलेडी मिशेल ओबामा यांनी कांही कानमंत्र दिले असून त्यात सार्वजनिक जीवनात आपल्यावर असलेल्या फोकसला कसे सामोरे जायचे याचाही समावेश आहे.

व्हेलरी यांनी मिशेल यांच्या भेटीचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला असल्याचे सांगितले आहेच पण आत्तापर्यंतच्या आयुष्यात ज्या प्रभाव पाडणार्‍या व्यक्ती भेटल्या त्यात मिशेल यांचा नंबर वरचा असल्याचेही कबूल केले आहे. जी आठ देशच्या नेत्यांबरोबरच्या बैठकीत व्हाईट हाऊसमध्ये मिशेल यांनी व्हेलरी यांचे स्वागत केले तेव्हाच मिशेल यांचा करिश्मा आपल्याला जाणवला. त्या राजकीय करियरही उत्तमप्रकारे करू शकतील असा विश्वासही व्हेलरी यांनी यावेळी व्यक्त केला.

फ्रान्सने नवे प्रेसिडेंट म्हणून फ्रँकॉईस होलंड यांची निवड केली आहे. मात्र व्हेलरी यांना फर्स्ट लेडीचा मान देताना सार्‍यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या होत्या. कारण हे दोघे २००७ पासून एकत्र राहात असले तरी त्यांनी विवाह केलेला नाही. व्हेलरी यांनी यापूर्वी दोन वेळा घटस्फोट घेतला आहे आणि त्या तीन टीनएज मुलांची आई आहेत. तसेच फ्रान्सची फर्स्ट लेडी बनल्यावरही त्यांनी आपले करिअर सोडणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. व्हेलरी या पत्रकार असून त्या आपली पत्रकारिता यापुढेही सुरू ठेवणार आहेत.