क्रिकेट खेळ कोणाचा ?

काल शाहरूख खान याने वानखेडे स्टेडियमवर दारू पिऊन गोंधळ घातला. गेल्या महिन्यात सैफ अली खानने मुंबईतल्या एका हॉटेलात एका परदेशी नागरिकाला मारहाण केली. सलमान खान तर नेहमीच असे उद्योग करीत असतो म्हणून कधी काळविटाच्या हत्येत तर कधी दारू पिऊन गाडी चालवून गाडी चालवून तो कारवाई ओढवून घेत असतो. या सगळ्यात आमीर खान मात्र वेगळा आहे. तोच कसा काय अपवाद झालाय कोणास ठावूक.

काल वानखेडे स्टेडियमवर शाहरूख खान दारू पिऊन आला होता. त्याच्या सोबत त्याचे काही मित्र आणि मुलेही होती. ती मुले स्टेडियमवर आपला सामना खेळत होती. त्यांना हटकल्याचा राग शाहरूखखानला आहे. शिवाय चालू असलेला सामना संपताच तो पळत मैदानात पळायला लागला पण सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखले. त्याने नियमानुसार त्याला अटकाव केला; पण त्यामुळे शाहरूख चवताळला आणि त्यांने सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ आणि धक्का बुक्की सुरू केली.

त्यामुळे बीसीसीआयचे पदाधिकारी धावले पण आधीच मर्कट त्यात मद्य प्याला अशी अवस्था झालेल्या खानने या पदाधिकार्‍यांनाही घाणेरडया शब्दात शिव्या दिल्या. यावर या पदाधिकार्‍यांनी पोलिसांना बोलावले. हा सारा प्रकार सुरू असताना शाहरूख खानच्या तोंडाला दारूचा घाण वास येत होता. तसे पोलिसांनीही सांगितली. याचा अर्थ तो नशेत होता आणि त्याला आपण काय करीत आहोत याची शुद्ध नव्हती.

अर्थात पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून तो दारूच्या नशेत होता याची अधिकृत नोंद करायला हवी होती. पण शेवटी तो पैसेवाला आहे आणि हिंदी चित्रपटांचा बादशाह वगैरे आहे. त्यामुळे पोलीस त्याच्या बाबतीत बोटचेपी भूमिका घेत आहेत. एकदंरीत माध्यमांनी हा सारा प्रकार उघड केला म्हणून लोकांना कळला तरी पण पोलीस आणि सरकार यावर शक्यतो पडदा टाकण्याचाच प्रयत्न करतील.

विलासराव देशमुख बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. त्यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनीही सौम्यच प्रतिक्रिया नोंदवली. पहावे लागेल, ऐकावे लागेल, चौकशी करावी लागेल अशी शेळपट उत्तरे त्यांनी दिली. त्या ऐवजी त्यांनी तो दोषी आढळला तर त्याच्यावर कायद्याने योग्य ती आणि कडक कारवाई करावी लागेल असे ठोस उद्गार काढायला हवे होते.

याच शाह़रुख खानला अमरिकेत विमानतळावर तपासणीसाठी थांबवण्यात आले तेव्हा भारतातले त्याच्या सिनेमावर पागल झालेले अविचारी लोक चिडले होते. अमेरिकेच्या विमानतळावर शाहरूख खानची तपासणी होते हा भारताचा अपमान आहे असे म्हणण्यापर्यंत या मूढ लोकांची मजल गेली होती. चित्रपटातली प्रसिद्धी कोणत्या मर्यादेपर्यंत मानायची याचे काही तारतम्यच या लोकांना नाही. क्रिकेटच्या मैदानावर जो माणूस गोंधळ घालतो आणि गावंढळासारख्या शिव्या देतो तो काय देशाचा मानबिंदू असतो का ? या लोकांना क्रिकेटच्या क्षेत्रात आणून आयपीएलने काय घोटाळा केला आहे याची ही झलक आहे.

आयपीएलने या खेळात पैसा आणला. खेळाडू श्रीमंत झाले पण जनतेला काय मिळाले ? खेळाचे गांभीर्य कमी झाले. खेळ हा शेवटी खेळ असतो. त्यात असे नवकोट नारायण आणि उल्लूमशाल लोक शिरले तर क्रिकेटचा तमाशा होतो. केंद्रिय क्रीडा मंत्री अजय माकेन यांनी काल लोकसभेत या विषयावर बोलताना फार कटू वस्तुस्थिती सांगितली. आयपीएल हा खेळ राहिला नसून काळा पैसा पांढरा करण्याचा फंडा झाला आहे असे माकेन यांनी म्हटले. 

लोकांनाही आता या खेळाविषयी स्वारस्य वाटेनासे झाले आहे आणि हे सामने टीव्हीवर पाहणार्‍यांची संख्या रोडावत चालली आहे. आपल्या देशात आधीच क्रिकेटचा ज्वर फार लवकर वाढतो. त्यात असे नट नट्या आणि लफडेबाज लोक उतरायाला लागले तर या खेळाचे रूपांतर विकृतीत झाल्याशिवाय राहणार नाही. लोक तर आता विटायला लागले आहेत. पुढच्या आयपीएलला प्रसारणाचे हक्क मागायला कोणी पुढे तरी येईल की नाही याबाबत शंका आहे.

अजय माकन हा एकमेव मंत्री असा आहे की जो कि‘केटसह सर्वच खेळांना आणि संघटनांना शिस्त लावण्याचा आटापिटा करीत आहे पण, सरकारमध्येच अशी विसंगती आहे की याच मंत्रिमंडळात बीसीसीआय मध्ये गुंतलेले मंत्री आहेत. ते या खेळाला शिस्त लावायला तयार नाहीत. राजकारण्यांनी या संघटनांतून वर्षानुवर्षे मुक्काम टाकून बसू नये. वय झाल्यावर राजीनामे द्यावेत असा नियम करायला ते उत्सुक आहेत पण  शरद पवार,राजीव शुक्ला असे मंत्रीच माकेन यांना विरोध करीत आहेत. केन्द्रीय मंत्रिमंडळातच असा बेबनाव असल्यावर क्रीडा क्षेत्राला शिस्त कशी लागणार ? या क्षेत्रात खेळाडू सोडून इतर सर्वांचाच धुमाकूळ सुरू आहे. आधी राजकारणी शिरले नंतर आता आयपीएलने काळा आणि बेहिशेबी पैसा कमावणारे उद्योगपती आणि सिने कलाकार घुसले. यांना खेळात काहीच रुची नाही. त्यांना फक्त प्रसिद्धी आणि पैसे पाहिजेत. त्यांनी आपली पैशाची मस्ती दाखवण्याचा मार्ग म्हणून या खेळाकडे पाहून त्याचे पावित्र्य नष्ट केले आहे.

Leave a Comment