‘बोल बच्चन’मध्ये अँथोनी गोन्साल्व्हिस

मनमोहन देसाईंच्या सुपरहिट ‘अमर अकबर अँथोनी’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलेले अँथोनी गोन्साल्व्हिसचे पात्र आजही रसिकांच्या चांगलेच स्मरणात आहे. या पात्राचा मनावर इतका पगडा आहे की, आजही अँथोनी गोन्साल्व्हिस हे नाव उच्चारताच सर्वप्रथम अमिताभचा चेहरा समोर येतो. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या आगामी ‘बोल बच्चन’ चित्रपटातील एका गाण्यात अमिताभ दिसणार आहेत. या गाण्यात त्यांची एंन्ट्री ‘माय नेम इज अँथोनी गोन्साल्व्हिस..’ गाण्यासोबत होते. ‘बोल बच्चन’साठी हे गाणे पुन्हा कंपोज करण्यात आले असून, यावेळीही ते अमिताभच्याच आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे. या गाण्यात अमिताभसोबत अजय देवगण आणि अभिषेक बच्चन यांनीही ताल धरला आहे. अमर अकबर अँथोनी सिनेमातील गाण्यासोबत अमिताभच्या इतर हिट चित्रपटातील गाण्यांचा समावेश करून एक मिक्स सॉंग बनवण्यात आले आहे. हिमेश रेशमियाने या गाण्याला संगीत दिले असून, चिन्नी प्रकाश यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. नव्या जमान्यातील अमिताभने साकारलेला अँथोनी कसा आहे ते लवकरच समजेल.

Leave a Comment