
वॉशिंग्टन दि.१४ – अतिप्राचीन माया संस्कृतीच्या कॅलेंडरप्रमाणे यावर्षी २१ डिसेंबर ला पृथ्वीचा नाश होणार, डूम्स डे येणार अशा अफवांनी गतवर्षीपासून जगभरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच याच माया संस्कृतीचे ७००० सालापर्यंतचे भविष्य आणि ग्रहस्थिती कशी असेल हे दाखविणारे कॅलेंडर पुरातत्त्व संशोधकांना नुकतेच सापडले आहे. ग्वाटेमाला येथील उत्खनानात बोस्टन विद्यापीठातील पुरातत्त्व संशोधक विल्यम सॅटर्नो आणि त्यांच्या पथकाला एक प्राचीन इमारत आढळली असून या इमारतींच्या भिंतीवर “माया संस्कृतीतील’ राजाची म्युरल स्वरूपातील स्पष्ट मूर्ती आढळली आहे. इतकेच नव्हे तर याच भिंतीवर माया संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या नोंदी आणि ग्रहांची परिभ्रमणे नोंदविलेल्या नोंदीही आढळल्या असून त्यात भूतकाळातील तसेच भविष्यातील नोंदींचाही अंतर्भाव आहे .त्यामुळे २०१२ सालात पृथ्वी नाश होणार हा दावाही खोटा ठरला आहे.
विल्यम यांच्या मते या नव्याने सापडलेल्या कॅलेंडरमध्ये चंद्राच्या गतीच्या नोंदी जशा आहेत तसेच मंगळ व शुक्र ग्रहांच्या भ्रमणाच्या नोंदही स्पष्ट पणे नोंदविल्या आहेत. त्यावरून सुमारे १००० वर्षांपर्यंत मध्य अमेरिकेतील या संस्कृतीवर चंद्र, मंगळ व शुक्र ग्रहांचा असलेला प्रभाव स्पष्ट होतो. महिन्यांच्या तसेच ऋतू आणि वर्षांच्या अचूक नोंदी येथे सापडल्या आहेत व त्यावरून त्या काळी कालचक्राची गणना कशी केली जात होती यावरही प्रकाश पडतो आहे.
विल्यम आणि त्यांच्या संशोधक पथकाने दिलेल्या माहितीनुसार या कॅलेंडरवर कांही लाल व काळे ठिपके आहेत. कांही चौकटी आणि रेषाही आहेत. ही माया संस्कृतीची नंबरिंगची पद्धत आहे. माया संस्कृतीचे गाढे अभ्यासक व तज्ञ डेव्हीड स्टुअर्ट यांनी या नंबरिंगचा अर्थ समजावून दिला आहे. त्यांच्या मते हे ल्यूनर टेबल किवा चांद्र पत्रक असून त्यात चंद्रकलांची ४७८४ दिवसांची माहिती आहे.२७ कॉलममध्ये विभागलेले हे वेळापत्रक असून प्रत्येक कॉलममध्ये सहा चांद्रवर्षांची माहिती अशा स्वरूपात आहे. त्या काळी तीन चंद्रदेवता माया संस्कृतीत मानल्या गेलेल्या होत्या. जग्वार, स्कल आणि वूमन अशा या चांद्रदेवता असून प्रत्येक कॉलममध्ये त्या क्रमानुसार येतात. त्याकाळचे धर्मगुरू अथवा ज्योतिषी त्यावरून संबंधित दिवस कोणत्या चंद्रदेवतेच्या प्रभावाखाली आहे ते सांगत असावेत.
या इमारतीच्या दुसर्या भिंतीवर चार कॉलम कोरलेले असून त्यात प्रचंड आकडेमोड आहे. मंगळ आणि शुक्राला विश्वाची पूर्ण फेरी मारून परत मूळ स्थानावर यायला किती काळ लागतो या संबंधीच्या त्या नोंदी आहेत. या कॅलेंडरवर सुमारे सात हजार वर्षांचा अंदाज दिला गेला आहे.
भारतीय पंचांगाप्रमाणेच हे कॅलेंडर असल्याचे या माहितीवरून स्पष्ट होत असून त्यामुळे यंदाच्या वर्षी प्रलय होणार वगैरे भाकिते खोटी असल्याचे मत हे संशोधक व्यक्त करत आहेत.
