ममता दीदींच्या वक्तव्यामुळे खळबळ

नवी दिल्ली, दि. १२ – मध्यावधी निवडणुकांबाबत तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ आणि अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसने मध्यावधी निवडणुकांची शक्यताच फेटाळून लावली आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील संपुआ-२ सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करील असे कॉंग्रेसने म्हटले आहे. मात्र भाजपाने लवकरात लवकर सार्वत्रिक निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.
    तृणमूल कॉंग्रेसच्या कोलकत्यातील एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनजी यांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकांची शक्यता व्यक्त केली आणि तृणमूल कार्यकर्त्याना कामाला लागण्याचे आवाहन केले होते. पुढील वर्षी २०१३ साली मध्यवधी निवडणुकांची होण्याची शक्यता आहे,  असे त्या म्हणाल्या. मध्यंतरी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देखील महाराष्ट्रात आपल्या पक्षाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मेळाव्यात भाषण करताना मध्यावधी निवडणुकांची शक्यता व्यक्त केली आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आदेश दिले होते. अर्थात नेहमीप्रमाणेच त्यांनी तत्काळ सारवासारव सुद्धा केली होती. विद्यमान १५ व्या लोकसभेची मुदत जून २०१४ पर्यंत आहे.
    ममतांच्या या वक्तव्याचे स्वागत करुन भाजपाचे प्रवक्ता शाहनवाझ हुसेन यांनी लोकसभेच्या मध्यावधी सार्वत्रिक निवडणुका २०१३ सालापेक्षा याच वर्षी झाल्या तर अधिक बरे होईल, असा टोला हाणला. तर कॉंग्रेसचे प्रवक्ता रशीद अल्वी यांनी केंद्र सरकार आपला पाच वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण करील आणि निवडणुका ठरल्याप्रमाणे २०१४ सालीच होतील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.  

Leave a Comment