पुणे विद्यापीठाला लवकरच नवे कुलगुरु

पुणे, दि. १४ – पुणे विद्यापीठाला आता लवकरच नवे कुलगुरू मिळणार आहेत. कुलगुरूपदासाठी अंतिमत: निश्‍चित करण्यात आलेल्या पाच जणांच्या मुलाखती मंगळवारी मुंबईत होणार असल्याचे समजते. कुलगुरू निवड समितीविरोधात दाखल केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावल्याने निवड प्रक्रीया पुन्हा सुरु झाली.
    कुलगुरू शोध समितीने  डिसेंबर २०११ मध्ये पुण्यात यशदा येथे कुलगुरू पदासाठी इच्छुक असलेल्या १९ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यातील पाच उमेदवारांची यादी राज्यपाल कार्यलयाकडे  पाठवली होती. मात्र याचिकेवरील निकाल जाहिर केला जात नाही; तोपर्यंत कुलगुरूंचे नाव घोषित करू नका, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार कुलगुरू निवड प्रक्रीया थांबविण्यात आली होती. कुलपती कार्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या यादीतील पाच उमेदवारांच्या प्रथम  मुलाखती  घेतल्या  जाणार आहेत. त्यातून एका उमेदवाराची कुलगुरू पदी नियुक्ती केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
    आता या प्रक्रीयेतील अंतिम टप्पा आज पार पडणार आहे. विद्यापीठाचे कुलपती व राज्यपाल के. शंकरनारायण मुंबईत राजभवन येथे पाच जणांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यामध्ये पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पंडीत विद्यासागर, विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. वासुदेव गाडे, दिलीप उके यांचासह पाच जणांचा समावेश आहे. या सर्वांना मुलाखती संदर्भात राज्यपाल कार्यालयाकडून ई-मेल पाठविण्यात आल्याचे समजते. या पाच जणांमधून कुलगुरूंची निवड केली जाणार आहे. गेल्या दहा महिन्यांपासून विद्यापीठ कुलगुरूंच्या प्रतिक्षेत आहे. न्यायालयाने नुकतीच ही याचिका फेटाळल्याने कुलगुरू निवड प्रक्रिया पुन्हा सुरु झाली. त्यामुळे नवे कुलगुरू कोण याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.