लोकसंख्येची समस्या

    भागरताची लोकसंख्या वाढत आहे आणि ती कमी कशी करता येईल यावर बराच काथ्याकूट जारी आहे. भारताची लोकसंख्या वाढत असतानाच जगातल्या काही देशांना लोकसंख्या कशी वाढवता येईल, यावर विचार करावा लागत आहे. कारण त्यांची लोकसंख्या घटत आहे. सार्‍या जगातच लोकसंख्येच्या बाबतीत दोन प्रकारची स्थिती आहे. भारतासारख्या अविकसित देशात लोकसंख्या कमी करण्याच्या मोहिमा सुरू आहेत. तर काही प्रगत देशात ती वाढवण्याच्या मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. त्या देशातल्या औद्योगिक प्रगतीने त्यांची संख्या आपोआपच घटली आहे. जगात आजवर तसेच आढळले आहे. तेव्हा कुटुंब नियोजन म्हणजे मुले कमी असावीत याचा प्रचार ही कल्पना आता मागे पडली असून, मुले अधिक असावीत यासाठी प्रयत्न करणे हाही कुटुंब नियोजनाचाच एक भाग झाला आहे. जगात आता वैद्यकीय क्षेत्रात एक मोठाच गंभीर विषय चर्चिला जात आहे. तो म्हणजे जगातल्या सगळ्याच देशातल्या पुरुषांची प्रजनन क्षमतेत कमतरता आली आहे आणि ती कशी वाढवावी हा डॉक्टरांना पडलेला प्रश्‍न आहे. ही स्थिती मोठीच चिंताजनक आहे कारण अनेकांना मुलेच झाली नाहीत, तर त्यांच्याही आयुष्यात अनेक समस्या निर्माण होणार आहेत आणि त्यांचा समाजावरही परिणाम होणार आहे.
    कुटुंब नियोजनाच्या मोहिमा चालवणारांवर आता पश्‍चात्ताप करण्याची वेळ आली आहे. त्यांनी केवळ मुले कमी असावीत असाच एकांगी प्रचार केला आहे. पण मुले कमी असणे म्हणजे कुटुंब नियोजन नव्हे. अनेकांचा असा समज झालेला आहे की दोन किंवा तीन मुले म्हणजे कुटुंब नियोजन. आता आता तर एकच मूल होऊ देण्यावर भर आहे. याचे विपरीत परिणाम झाले आहेत. कुटुंब नियोजन म्हणजे समाजाची गरज लक्षात घेऊन मुलांची संख्या कमी किंवा जास्त करणे. यातला जास्त करणे हा भाग कोणी लक्षातच घेतला नाही. आता काही देशांना तो लक्षात घ्यावा लागत आहे. शिवाय लोकसंख्या कमी जास्त होण्याबरोबरच लोकसंख्येत विविध वयोगटाचा समतोल राखला जाणे हेही आवश्यक असते. स्त्री आणि पुरुष यांच्या संख्येत समतोल आहे का. वृद्धांची संख्या किती, तरुण किती आहेत याला महत्त्व असते.  आपला देश २०२० साली महाशक्ती होईल असे डॉ. अब्दुल कलाम यांनी म्हटले तेव्हा म्हणजे १९९१ साली भारताच्या लोकसंख्येत तरुणांची संख्या मोठी होती आणि तीच भारताची जमेची बाजू होती.
    आता या गोष्टीला २० वर्षे होऊन गेली. ९१ साली तरुण असलेली लोकसंख्या आता २० वर्षांनी म्हातारी झाली. आता लोकसंख्येचे वर्गीकरण सादर व्हायला लागले असून देशातल्या लोकसंख्येतले वृद्धांचे प्रमाण वाढत चालले असल्याचे दिसायला लागले आहे. कोणत्याही देशाचे सरासरी वय  असते. त्या देशात ज्या वयोगटातले लोक जास्त असतील तो त्या देशाचा वयोगट असतो असे ढोबळ मानाने म्हणता येईल. अमेरिका, जपान आणि चीन या देशांचे सरासरी वय भारतापेक्षा जास्त आहे. काळाच्या ओघात तसे होत असते. उदाहरणार्थ  १९५० साली जपानची लोकसंख्या १२ कोटी होती. ती आताही १२ कोटीच आहे. तिथल्या लोकांनी देशाच्या भल्यासाठी कुटुंब नियोजनाचा कडक अंमल करून लोकसंख्या वाढू दिली नाही. राहणीमान चांगले असल्याने  लोक जास्त जगायला लागले आणि त्यांनी कुटुंब नियोजनाची अंमलबजावणी कसोशीने केल्यामुळे त्यांना फार मुले झाली नाहीत. पहिली पिढी या वृद्धांची, दुसरी पिढी त्यांच्या मुला-मुलींची. या दुसर्‍या पिढीत पहिल्या पिढीपेक्षा कमी लोक आहेत कारण पहिल्या पिढीने मुलेच होऊ दिली नाहीत. मुले कमी म्हणून तिसर्‍या पिढीतही नातवंडे कमी. अशा प्रकारे पहिल्या पिढीतल्या म्हणजे साठी उलटलेल्या लोकांची संख्या मोठी आणि तरुण, बालकांची संख्या कमी. एकंदरीत ३४ टक्के वृद्ध, १४ टक्के बालके आणि जेमतेम ५० टक्के लोक १६ ते ५९ या वयोगटातले. अशा रितीने लोकसंख्येत म्हातारे जास्त.             आपल्याही देशात कुटुंब नियोजनाचा प्रसार झालेला आहे आणि आता मुलांची संख्या कमी असावी असा लोकांचा दृष्टीकोन आहे. त्यामुळे आपल्या देशातली आगामी १२ वर्षात वृद्धांची संख्या जपानप्रमाणे मोठी होणार आहे. ही स्थिती चिंताजनक आहे. १९९० साली देशातल्या लोकसंख्येमध्ये केवळ ११ टक्के एवढी लोकसंख्या वृद्धांची होती. ती २०२५ साली २५ टक्के होईल असा अंदाज आहे. ९० साली जगाच्या पाठीवर भारत हा वृद्धांचे प्रमाण सर्वात कमी असलेला देश होता. २०२५ साली भारतातल्या वृद्धांची संख्या वाढलेली असेल. कारण आज जे लोक तरुण आहेत ते २५ साली वृद्ध झालेले असतील. २०२५ साली वृद्धांचे प्रमाण वाढेल तेव्हा त्याचे परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक स्थितीवर होणार आहेत. वृद्धांचे प्रमाण मोजताना वृद्ध म्हणजे ६० वर्षे उलटलेली व्यक्ती असे गृहित धरलेले असते. देशाच्या लोकसंख्येपैकी २५ टक्के लोक जर या वयोगटातले असतील तर त्या लोकांच्यामुळे अनेक प्रकारच्या नव्या समस्या निर्माण झालेल्या दिसणार आहेत.     

1 thought on “लोकसंख्येची समस्या”

  1. this information is absolutely correct nd then always share your opinions..
    Thanks for telling information…

Leave a Comment