उपनिरीक्षकावर हल्ला करणार्‍या गुंडावर पोलिसांकडून गोळीबार

मालेगाव, दि. ४ – चोरी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिस उपनिरीक्षकावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात उपनिरीक्षक आर.डी.मोरे जखमी झाले. मोरे यांच्या सहकारी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोर गुंड फिरोझ अहमद गणी उर्फ एक्का हाही जखमी झाला. त्याला पोलिसांनी अटक केली. तथापि फिरोझचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.
    मालेगावमधील नवीन बस स्थानक परिसरात असलेल्या एका ऑईल मिलमध्ये शुक्रवारी पहाटे चोरटे शिरल्याची खबर मिळताच उपनिरीक्षक मोरे आपल्या पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी एक्का व त्याचे साथीदार ऑईल मिलमधून तांब्याच्या वस्तू चोरून नेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांना अडविण्याचा प्रयत्न करताच एक्काने मोरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यात मोरे गंभीर जखमी झाले. तशाही परिस्थितीत त्यांनी एक्कावर आपल्या पिस्तुलातून गोळी झाडली आणि त्याला जखमी केले. दरम्यान एक्का उर्फ फिरोझचे साथीदार घटनास्थळावरून पळून गेले. जखमी एक्काला पोलिसांनी ताब्यात घेतले. उपनिरीक्षक मोरे यांच्यावर मालेगावच्या सामान्य रूग्णालयात उपचार कऱण्यात आले. तर एक्काला धुळ्याच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.