बोफोर्स प्रकरणी दोषी असलेल्यांना शिक्षा – अरूण जेटली

नवी दिल्ली, दि. २९  – भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात आम्ही बोफोर्स घोटाळ्यातील दोषींना शिक्षा व्हावी म्हणून शक्य ते सर्व प्रयत्न केले होते, असे स्पष्टीकरण राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी दिले. मात्र कॉंग्रेसने आपल्या सत्ताकाळात केवळ बोफोर्स प्रकरणाचा गळा घोटण्याचेच प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.
    एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना, भाजपाचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांनी बोफोर्स प्रकरणावरसुद्धा चर्चा केली. बोफोर्स घोटाळ्यानंतर अनेक वर्ष केंद्रात कॉंग्रेस किंवा कॉंग्रेसचे समर्थन असणारेच सरकार होते. या काळात हे प्रकरण मूळापासून नष्ट करण्याचाच प्रयत्न झाला. १९९८ ते २००४ या भाजपा प्रणित रालोआ सरकारच्या सत्ताकाळातच या प्रकरणाची सखोल चौकशी करून हा घोटाळा तार्किकदृष्ट्या सिद्ध करण्यात आला, असे जेटली म्हणाले. या काळात आम्ही केंद्रीय अन्वेषण विभागाला काम करण्यासाठी स्वायत्तता दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.