
मुंबई, दि. २७ – पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते डहाणू थेट लोकल सेवा सुरु करण्यासंबंधी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच उपनगरी पहिल्या वर्गाच्या भाड्यात केलेली दरवाढ रद्द करण्याचा विचारही करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे मंत्री मुकुल रॉय यांनी माजी रेल्वे मंत्री राम नाईक यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या भाजपच्या शिष्टमंडाळाला दिले.
राम नाईक यांच्या शिष्टमंडळात खासदार पियुष गोयल, आमदार चिंतामण वनगा, डहाणूच्या माजी नगराध्यक्ष आणि बोरिवलीच्या नगरसेविका मनिषा चौधरी आदी मान्यवरांचा समावेश होता.
५७ कोटी रुपये खर्च करुन विरार – डहाणू रेल्वे मार्ग रुंद करण्यात आला असून, चर्चगेट ते डहाणू या मार्गावर विद्युतप्रवाह डायरेक्ट करंटच्याऐवजी (डीसी) अल्टरनेट करंट (एसी) परिवर्तीत करण्यात आला आहे. त्यामुळे चर्चगेट ते डहाणूपर्यंत थेट लोकल सेवा होऊ शकते. तांत्रिकदृष्ट्या असे करणे शक्य असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी मान्य केले. तसेच लोकलसेवा सुरु करण्यासंबंधी सकारात्मक निर्णय शक्यतो लवकरच घेण्यात येईल, असे रॉय यांनी सांगितले.
याशिवाय, दुसर्या वर्गाची तसेच ए.सी.थ्री टायर आणि ए.सी.चेअर कार यांची प्रस्तावित भाडेवाढ रेल्वे मंत्र्यांनी रद्द केली. परंतु त्या सेवेच्या समकक्ष असलेल्या सर्वसाधारण पहिल्या वर्गाची प्रति किलोमीटर १० पैशाची भाडेवाढ मागे न घेतल्याने प्रथम वर्गाच्या उपनगरी प्रवाशांना भेदभावाची वागणूक दिली असल्याने ती भाडेवाढ मागे घेण्याचा विचार केला जाईल, असेही रॉय यांनी सांगितले.
