राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे वेध

पुणे, दि. २४ – सगळ्या देशाला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे आता वेध लागले असताना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राष्ट्रपती पदावरील व्यक्ती अराजकीय व सर्वांच्या सहमतीची असावी,  असा एक विचार मांडला आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदांवर डॉ. करण सिंग आणि डॉ. रघुनाथ माशेलकर यांची निवड व्हावी, अशी मागणी मान्यवरांनी प्रसिद्धीपत्रकाद्वरे केली आहे.
    माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. अरूण निगवेकर, खगोल शाश्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप, डॉ. विश्‍वनाथ कराड आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी याला पाठींबा दिला आहे.
    पत्रकात म्हटले आहे, डॉ. अब्दुल कलाम यांच्यासारख्या  शास्त्रज्ञांनी राष्ट्रपती पदाची शोभा निश्‍चितपणे वाढवली. सध्याची राजकीय परिस्थिती बघता, कोणताही पक्ष स्वबळावर राष्ट्रपती वा उपराष्ट्रपती पदासाठी स्वत:चा उमेदवार निवडून आणणे अशक्य आहे. यामुळे कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांनी  सर्वसंमतीने एक सर्वमान्य, खर्‍या अर्थाने या पदांची व आपल्या भारताची उंची वाढवणारे उमेदवार निवडावेत.

Leave a Comment